चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई : 18 किलो 326 ग्रॅम गांजासह आरोपी जाळ्यात
9 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : अंमली पदार्थविरोधी कारवाईत पोलिसांचे यश
चाळीसगाव (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : चाळीसगाव शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 18 किलो 326 ग्रॅम गांजा जप्त केला. संशयीत प्रफुल्ल केशव पवार (45, चामुंडा माता मंदिराजवळ, डोंगरी नदीच्या बाजूला, चाळीसगाव) याला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत सुमारे नऊ लाख 34 हजार 300 रुपये आहे.
चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई
चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चामुंडा माता मंदिराजवळील डोंगरी नदीच्या बाजूला राहणारा संशयीत प्रफुल्ल केशव पवार हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचा साठा करून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या ताब्यातून गांजाचा मोठा साठा हस्तगत केला. या प्रकरणी पोलीस शिपाई दिलीप शिवाजी राठोड (37) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



असा साठा केला जप्त
पोलिसांनी एका प्लास्टिकच्या पिशवीतून दोन लाख 70 हजार 50 रुपये किंमतीचा पाच किलो 401 ग्रॅम वजनाचा गांजा तसेच दुसर्या पोत्यातून सहा लाख 64 हजार 250 रुपये किंमतीचा 13 किलो 285 ग्रॅम गांजा मिळून एकूण 18 किलो 686 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजाची एकूण मुद्देमालाची किंमत नऊ लाख 34 हजार 300 रुपये इतकी आहे.
या प्रकरणी आरोपी प्रफुल्ल केशव पवार याला अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मन्नळ व सहकार्यांनी केली. तपास पेलीस उपनिरीक्षक संदीप भुले करीत आहेत.
कारवाईने उडाली खळबळ
अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करणार्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, या प्रकरणात आणखी काही धागेदोरे हाती लागतात का ? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
