यावल शहरात ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी शहरातून निघाली भव्य मिरवणूक
यावल (बुधवार, 26 ऑगस्ट 2026) : यावल शहरात बुधवारी मोठ्या उत्साहात ईद मिलादुन्नबी साजरी करण्यात आली. सकाळी 10 वाजेपासून शहरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी पवित्र नातेपाक सह धार्मिक ध्वज हातात घेवुन सहभाग घेतला होता. शहरात विविध ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले.
शहरात निघाली मिरवणूक
शहरात ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातुन खिर्णीपुरा येथील नगीना मस्जीद चौकातून भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली. मोठ्या उत्साहात ही मिरवणूक निघाली. हजारोच्या संख्येत मुस्लिम समाजबांधव यात सहभागी झाले होते. हिरवे, भगवे ध्वज हातात घेवून नातेपाक पढण करीत तसेचे विविध वाद्य घेवून निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. शहरातून ही मिरवणूक नगीना मस्जिद, खिर्णीपुरा येथून सुदर्शन चौक, डांगपुरा व तेथुन मेन रोडाने नगीना मशिदीकडून बुरूज चौकात आल्यानंतर तेथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.



अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून मिठाई वाटप करण्यात आली. दुपारी दिड वाजेला मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणुकीत पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलिस निरिक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार वासुदेव मराठे, सागर कोळी सह कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मोठ्या उत्साहात नाते पाक पढण करीत ईद मिलादुन्नबीची ही मिरवणूक सपंन्न झाली. शहरातील मुस्लिम समाज बांधव आबाल, वृद्ध या मिरवणुकी मध्ये मोठ्या सख्येत सहभागी झाले होते.
शहरात विविध भागात सजावट, रोशनाई
शहरातील बुरूज चौकापासून तेथे एस.एच.खान चौकापर्यंत रस्त्यावर सुंदर अशी सजावट करण्यात आली व रस्त्यावर रोशनाई करण्यात आली. आठवडे बाजार भागात पंचशील नगरापासून ते मशिदीपर्यंत व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास लागून असलेल्या संपूर्ण वस्तीत मुख्य प्रवेशव्दार तयार करीत भव्य सजावट व रोशनाई करण्यात आली. सुदर्शन चौकातदेखील संपुर्ण परिसराची सजावट करून लायटींग लावण्यात आली.

