चाळीसगावातील कुख्यात गुन्हेगार नागपूरात स्थानबद्ध

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई


चाळीसगाव (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार वाजीद खान साबीर खान (29, रा.नागद रोड, चाळीसगाव) यास जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर स्थानबद्ध करण्यात आले आहे. संशयीताची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

चाळीसगाव शहर पोलिसांनी दाखल केला प्रस्ताव
चाळीसगाव शहर पोलिसांच्या नोंदीनुसार, वाजीद खानविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत, दुखापत तसेच बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण केल्यासंबंधीच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.




यापूर्वीही करण्यात आल्या होत्या प्रतिबंधात्मक कारवाया
संबंधित गुन्हेगाराविरुद्ध यापूर्वी विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यात सीआरपीसीच्या कलम 110 व 107 अंतर्गत कारवाई, जळगाव व नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपारी तसेच यापूर्वीचा एमपीडीए प्रस्ताव यांचा समावेश आहे मात्र, या कारवायांनंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने पुन्हा गुन्हेगारी कारवायांकडे वळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

26 ऑगस्टला जिल्हाधिकार्‍यांचा आदेश
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध एमपीडीएअंतर्गत प्रस्ताव तयार करून तो 22 जून 2026 रोजी सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन करून तो पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बुधवार, 26 ऑगस्ट 2026 रोजी स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. आदेशानुसार संबंधितास नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

पोलिसांचे पथक कार्यरत
या कारवाईत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ, पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास पाटील, पोहेकॉ भूषण वंजारी आणि पोका विनोद पाटील यांनी संबंधितास 27 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !