जळगावात कैद्याच्या वाढदिवसानिमित्त कारागृहानजीक फटाके फोडले : पाच संशयीतांविरोधात गुन्हा
जळगाव (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : खुनाच्या आरोपात कारागृहात आलेल्या बंदीचा वाढदिवस असल्याने कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ फटाके फोडण्यात आले होते. या प्रकाराने कैद्यांच्या जीवाच्या सुरक्षेला हानी पोहोचली होती. हा प्रकार 20 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया, शुभम राहुल जाधव, विकास उर्फ गुड्डूया संतोष भालेराव, विशाल गोसावी व गौरव उर्फ बंटी गौतम सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण ?
खुनाच्या गुन्ह्यात 2021 पासून कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवसानिमित्त 20 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया, शुभम राहुल जाधव, विकास उर्फ गुड्डूया संतोष भालेराव, विशाल गोसावी व गौरव उर्फ बंटी गौतम सपकाळे हे 20 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या आवारात गेले. कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ टवाळखोरांनी फटाके फोडून वाढदिवस साजरा केला. हा प्रकार कारागृहामध्ये कर्तव्यावर हजर असलेल्या कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्यांनी टवाळखोरांना हटकल्यामुळे ते तेथून पसार झाले होते.



घडलेल्या प्रकाराची माहिती कारागृहातील कर्मचार्यांनी वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांना दिली. दरम्यान, फटाके फोडल्यामुळे त्यातून उडणार्या ठिणग्या संरक्षक भिंतीच्या आत येवून कॅन्टीनमधील मालमत्तेचे नुकसान होवून कारागृहातील कैद्यांच्या जिवितास हाणी पोहचली.
व्हिडीओ व्हायरल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा मायासह त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पुढील चौकशीसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
