चोपडा तालुक्यात बनावट देशी दारू कारखान्याचा पर्दाफाश : 18 लाख 32 हजारांचा मुद्देमाल हस्तगत


चोपडा (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : चोपडा तालुक्यात बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील भरारी पथकाला कळाल्यानंतर पथकाने गोपनीय पद्धत्तीने छापेमारी केली. यावेळी स्पिरीटपासून तयार केलेला देशी दारुचा साठा, रिकाम्या बाटल्या, बुच, मशनरी व इतर साहित्य असा एकूण 18 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई 25 ऑगस्ट रोजी चोपडा तालुक्यातील वैजापूरनजीक असलेल्या मुळ्यावतार येथे करण्यात आली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा तालुक्यातील मुळ्यावतार येथे गाळ्यांमध्ये स्पिरीटपासून देशी तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, नवनाथ घोडके, जवान राहुल भगत, दिलीप नागरे, राजाराम सोनवणे, विजय ढवळे, आरती घोंगडे, चोपडा विभागाचे निरीक्षक कय्यूम मोमीन, जवान भूषण परदेशी हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्पिरीटपासून मद्य निर्मिती करणार्‍या कारखान्यावर छापा टाकला. या प्रकरणी जवान विकास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण करत आहेत.



18 लाख 32 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत
पथकाने छापा टाकून तेथून स्पिरीटपासून तयार केलेला देशी दारुचा साठा, सीलबंद बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बनावट पत्र्याची बुच, लेबल, पुठ्याचे बॉक्स, इलेक्ट्रीक मोटर, पाण्याच्या टाक्या, सिलिंग मशीन व इतर बॉटलिंगचे साहित्य असा एकूण 18 लाख 32 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्यात केली जात होती विक्री
पथकाने कारखान्यामधून जप्त केलेल्या लेबलवर सदरचे मद्य हे महाराष्ट्र राज्यात विक्री करीता असे छापलेले आढळून आले त्यामुळे या कारखान्यात बनावट देशी मद्य तयार करून ते राज्यात विक्रीच्या उद्देशाने त्यावर असे लेबल लावले असल्याचा संशय पथकाने व्यक्त केला आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !