अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मनस्ताप : जळगावातील संशयीताला सहा महिन्यांची शिक्षा


जळगाव (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देण्यासह तिच्या आईला शिवीगाळ करत धमकी देणार्‍या धनराज गजानन कोळी याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण ?
अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन धनराज कोळी याने 21 ऑक्टोबर 2018 रोजी मुलीला बाहेर बोलवत ‘तू माझ्या सोबत प्रेमसंबंध ठेव’ असे म्हणाला होता. त्या वेळी मुलीची आई घराबाहेर आली असता तिला शिवीगाळ करत ‘तुझ्या मुलीला आम्ही उचलून घेऊन जाऊ, तू आमचे काहीही करू शकत नाही. आमच्या नांदी लागली तर तुला व्यवस्थित जगू देणार नाही’ अशी धमकी दिली होती. या घटनेपूर्वीही मुलगी शाळेत जात असताना धनराज हा तिचा वेळोवेळी पाठलाग करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या आई-वडिलांनी तिचे शाळेत जाणे बंद केले होते.



या प्रकरणी मुलीने एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे 5 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी मदत केली.

पुराव्यांसह युक्तीवाद ठरला ग्राह्य
सरकार पक्षाचा पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने धनराज याला पोक्सो कलमान्वये सहा महिने सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड, शांतताभंग केल्याप्रकरणी (भादंवि कलम 504) तीन महिने सश्रम कारावास, धमकी दिल्याप्रकरणी (भादंवि कलम 506) तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !