वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
https://youtube.com/shorts/RQDjE0c6tFE
भुसावळ (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात रक्षाबंधनाचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या पर्यावरण व सांस्कृतिक समितीच्या वतीने परिसरातील विविध वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
संरक्षणाची भावना जपणारा सण
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांनी रक्षाबंधनाचे सामाजिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरणीय महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ‘रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून संरक्षणाची भावना जपणारा सण आहे. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. वृक्ष मानवजातीचे खरे मित्र असून ते प्राणवायू, अन्न, औषधे व निवारा देतात. त्यामुळे वृक्षांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे,’ असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. फालक यांनी केले.


वृक्षांच्या संरक्षणाची घेतली प्रतिज्ञा
यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील विविध वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. वृक्ष हे मानवाचे जीवनदाता असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. तसेच वृक्षसंवर्धन, जलसंधारण आणि जैवविविधतेचे संरक्षण यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.रंजना ढाके, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
