ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरलेल्या जळगावातील अल्पवयीनाची रक्षाबंधनाच्या दिवशी आत्महत्या

‘आता सगळं सांभाळून घे दीदी’ नावाचे स्टेटस् टाकत संपवली जीवनयात्रा : जळगावच्या दशरथ नगरातील घटना


जळगाव (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरलेल्या तरुणाने हताश होत रक्षाबंधन सणाच्या दिवशीच आत्महत्या केली. मन हेलावणारी ही हृदयद्रावक घटना जळगावच्या दशरथ नगरात घडली. रोहित साहेबराव धनगर (17, जुना आसोदा रोड, जळगाव) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने आपल्या स्टेटसवर ‘आता सगळं सांभाळून घे दीदी’, मम्मी पप्पाला एकट सोडू नको, असेदेखील लिहिल्याचे समोर आले आहे.

काय घडले जळगावात
रोहित हा आई-वडील आणि लहान बहिणीसोबत जळगावच्या दशरथ नगरात वास्वत्याला होता. शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या दिवशी सकाळी रोहितने आपल्या लहान बहिणीकडून उत्साहात राखी बांधून घेतली. त्यानंतर आईला मामाच्या गावी जाण्यासाठी नवीन बस स्थानकावर सोडले. दुपारी तो वडिलांसोबत मेहरुण परिसरातील आत्याच्या घरी गेला व दोन वाजेच्या सुमारास माझे एक काम आहे, मी थोड्या वेळात येतो, असे सांगून तो दशरथ नगर येथील घरी परतला. घरी कुणीही नसताना रोहितने गळफास घेतला.

नातेवाईकांचा आक्रोश
काही वेळाने हा प्रकार निदर्शनास येताच नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सकाळीच बहिणीने ज्या हातावर राखी बांधली होती, त्याच हातावर राखी असलेल्या अवस्थेत रोहितचा मृतदेह पाहून रुग्णालयात कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. ऐन सणाच्या दिवशीच उघड्या पडलेल्या या दुःखाच्या डोंगरामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाईल गेमचे व्यसन जीवावर
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहितला मोबाईलवरील विविध ऑनलाईन गेमचे व्यसन जडले होते. या गेममधील आर्थिक व्यवहारांमुळे तो मोठ्या नैराश्यात होता आणि याच कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !