जळगावातील धाडसी घरफोडी उघड : 31 लाखांच्या मुद्देमालासह स्थानिक आरोपींना बेड्या

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


जळगाव (सोमवार, 31 ऑगस्ट 2026) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रामेश्वर कॉलनीतील घरफोडीची उकल करीत स्थानिक आरोपी भावंडांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून 31 लाख 26 हजार 800 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. विशाल मुरलीधर दाभाडे (25) व जितेंद्र मुरलीधर दाभाडे (27, दोघे रा.सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?
जळगावच्या रामेश्वर कॉलनीतील रहिवासी संगीता घुगे या आपल्या कुटुंबासह 27 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वराच्या दर्शनासाठी गेल्याने बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी ठरली. 27 ऑगस्टच्या रात्री 3.30 ते 28 ऑगस्टच्या रात्री 3.30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लांबवून चोरटे पसार झाले. घुगे कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या खबरीवरून संशयित दाभाडे बंधूंना ताब्यात घेत बोलते केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून सोन्याचे गंठन, मिनी पाटली, फॅन्सी शॉर्ट पाटली, काळेमणी पाटली, टॉप्स, विविध डिझाइनच्या अंगठ्या, नथ आणि चांदीचे जोडवे असा 31 लाख 26 हजार 800 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी, प्रदीप चौधरी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश टेकर, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे, विशाल कोळी, योगी घुगे व सुभाष साबळे आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !