रावेरात ‘कचरा कोंडी’ : पगाराअभावी कचरा संकलन मजुरांचा संप
नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी स्वतःचे वाहन लावून प्रभागातील कचरा उचलला
रावेर (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : पालिका हद्दीतील कचरा संकलन करणार्या कंत्राटदाराने कंत्राटी कर्मचार्यांना पगार न दिल्याने शहरात कचरा संकलनावर परिणाम झाला तर घरा-घरात साचलेल्या कचर्यावर पर्याय म्हणून प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पुढाकार घेत स्वतःचे वाहन उपलब्ध करून दिले आहे. मजुरांच्या मदतीने कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांमधून कचरा संकलित करण्यात आला. नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेऊन कचरा उचलल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
रोजंदारीच्या मजुरांमार्फत कचरा उचलण्यास सुरुवात
नगरसेवक पद्माकर महाजन यांनी सांगितले की, गतवर्षी कचरा संकलनाचा ठेका घेतलेल्या व्यक्तीकडून मजुरांना वेळेत पगार न दिल्याने संपूर्ण मजूर संपावर गेले आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून रोजंदारीवर मजूर लावून कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मजुरांच्या संपावर लवकरच तोडगा काढण्यात येईल आणि शहरातील कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पद्माकर महाजन यांनी सांगितले. कचरा संकलनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून शहर स्वच्छ ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



