पर्यावरण संवर्धनातून राष्ट्रनिर्मितीला हातभार द्या : विशाल सोनकुळ
जळगावातील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रम
जळगाव (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वाढता वापर, जलस्रोतांचे प्रदूषण आणि पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘राष्ट्रसेवा आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये मैत्रीची भूमिका’ या भावनेतून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण कार्यकर्ते विशाल सोनकुळ यांनी केले.
श्रम साधना ट्रस्ट संचालित एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रमाच्या तिसर्या दिवशी, बुधवार रोजी ‘एर्पींळीेपाशपींरश्र -ुरीशपशीी : राष्ट्रसेवा, राष्ट्रनिर्मितीमध्ये मैत्रीची भूमिका’ या विषयावर आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाटील यांनी महाविद्यालयाच्या वतीने विशाल सोनकुळ यांचे स्वागत केले. यावेळी विभागातील प्रा. प्रवीण पाटील, समन्वयक मीरा कुलकर्णी, धनश्री तायडे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता.
प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर प्रभावी प्रबोधन
विशाल सोनकुळ यांनी आपल्या अत्यंत संवादात्मक आणि प्रात्यक्षिकाधारित सत्रातून विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या वाढत्या वापराचे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगितले. प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्लास्टिक कचर्याचे योग्य संकलन व व्यवस्थापन करणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे तसेच परिसरातील नद्या, नाले, तलाव आणि इतर जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या सवयींमध्ये बदल करून पर्यावरण संवर्धनाला सुरुवात करता येते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना ‘प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि स्वच्छ जलस्रोत’ यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्रदूषणाची समस्या केवळ ऐकून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेता आली.
जल प्रहरी म्हणून उल्लेखनीय कार्य
विशाल सोनकुळ यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कार्याची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. जलशक्ती मंत्रालय आणि नीती आयोगाच्या वतीने 2024 मध्ये त्यांचा ‘जल प्रहरी’ म्हणून सन्मान करण्यात आला आहे. नद्या आणि जलस्रोतांच्या संवर्धनासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
तापी नदी खोर्यातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी ‘आओ तापी नदी को जाने’ या उपक्रमाच्या माध्यमातून कार्य केले असून, नदी संवर्धनाच्या विषयावर 100 हून अधिक वेबिनार आयोजित करून संशोधक, सामाजिक संस्था, नागरिक आणि पर्यावरणप्रेमींना एका व्यासपीठावर आणले आहे. त्यांच्या या कार्यातून नदी संवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
80 हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागृती
जळगाव जिल्ह्यातील 80 हून अधिक शाळांमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या उपक्रमांचे नेतृत्व करताना त्यांनी तब्बल 56 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरण जागृतीचा संदेश पोहोचविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक संकलन करण्यात आले असून, स्थानिक पातळीवर पुनर्वापर आणि पर्यावरणीय जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे काम करण्यात आले आहे.
या अनुभवांचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आजचा विद्यार्थी हा उद्याचा अभियंता, उद्योजक आणि जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच पर्यावरणाचा विचार करणे ही काळाची गरज आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेताना निसर्ग, जलस्रोत आणि समाजाप्रती असलेली जबाबदारीही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या विशेष सत्राला प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विषयाची मांडणी, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांशी साधलेला थेट संवाद यामुळे सत्र अत्यंत प्रभावी ठरले. प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि जलस्रोतांच्या स्वच्छतेचे महत्त्व समजल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या या अभियानात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. सूत्रसंचालन प्रीती शर्मा यांनी केले, तर प्रा. प्रवीण पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धी नेवे, अंजली जैन, उन्नती पाटील, सचिन भालेराव आणि तनुजा चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.के.पटनाईक आणि उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विभागाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक व पर्यावरणीय जाणीव निर्माण करणारे असे उपक्रम महाविद्यालयाच्या इंडक्शन कार्यक्रमाला अधिक अर्थपूर्ण बनवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

