आगामी सण-उत्सव शांततेत साजरे करा ; उपद्रवींवर पोलिसांची करडी नजर : रावेरात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे
रावेर (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : आगामी गणेशोत्सवासह सण-उत्सव शांततेत, उत्साहात आणि सर्वधर्मीय एकोप्याने साजरा करावे व उपद्रव निर्माण करणार्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी येथे म्हणाले.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरातील सुरक्षा व्यवस्था व तयारीचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत मराठा मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.
तर पोलिसांकडून होणार कठोर कारवाई
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्या तसेच उपद्रव करणार्या व्यक्तींवर पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला. धिवरे म्हणाले की, प्रत्येक गणेश मंडळासाठी पोलीस कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार असून, मंडळांना कोणतीही अडचण किंवा समस्या असल्यास संबंधित पोलीस कर्मचार्यांशी संपर्क साधावा. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि सामाजिक एकोप्याचा सण असून तो शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.

रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 सार्वजनिक गणपती
पोलीस निरीक्षक संदीप पाटील म्हणाले की, रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यावर्षी 23 सार्वजनिक गणपतींची स्थापना होणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विसर्जन मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा, तसेच उत्सवात ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अनुचित प्रकार टाळण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा आणि बंधू-भाव कायम ठेवण्यासाठी शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, नागरिक तसेच विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, नायब तहसीलदार साळी, पोलीस उपनिरीक्षक सखाराम कांबळे, मनोज महाजन, गटविकास अधिकारी विनोद मेढे, माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, नगरसेवक पद्माकर महाजन, नगरसेवक बंटी महाजन, राजेश शिंदे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. नितीन पाटील, डॉ.सुरेश पाटील, भास्कर महाजन, अशोक शिंदे, उमेश महाजन, मेहमूद शेख, बाळू शिरतुरे, दिलीप कांबळे, सी.एस.पाटील, पंकज वाघ, शेख शफी, जमील शेख, अयुब पहेलवान, मंजूर टेलर, शैलेंद्र अग्रवाल, अब्दुल मुत्तलिप यांच्यासह रावेर पोलीस ठाणे हद्दीतील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलीस पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

