शिरपूर तालुका पोलिसांसह वनविभागाची मोठी कारवाई : 90 गुंठ्यावरील सात कोटी 68 लाखांचा गांजा जागेवरच नष्ट

तीन स्वतंत्र गुन्हे पोलिसांकडून दाखल ः अवैधरित्या गांजा शेती करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ


शिरपूर (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आलेल्या गांजाच्या पिकावर शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाने संयुक्त कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नियतक्षेत्र भोरखेडा, रोहिणी आणि खंबाळे परिसरातील तब्बल 90 गुंठे क्षेत्रावरील एकूण तीन हजार 72 किलो गांजाची झाडे (कॅनाबीस वनस्पती) पोलिसांनी नष्ट केली. या कारवाईत गांजाच्या पिकाची अंदाजे किंमत सात कोटी 68 लाख रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
1 सप्टेंबर 2026 रोजी जामण्यापाणी वनक्षेत्रालगतच्या आजूबाजूच्या परिसरात अज्ञात इसमांकडून गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती वन विभाग व शिरपूर तालुका प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर वरिष्ठांना कल्पना देत 2 रोजी छाप्याची तयारी करण्यात आली. दुर्गम भाग असल्याने मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली व विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.


90 गुंठ्यावर फुलवली गांजाशेती
गुरुवार, 2 सप्टेंबर 2026 रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या अतिदुर्गम भागातील नियतक्षेत्र भोरखेडा, रोहिणी आणि खंबाळे येथे कारवाई केली. या परिसरातील एकूण 90 गुंठे क्षेत्रावर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणार्‍या कॅनाबीस वनस्पतीची लागवड झाल्याचे आढळले. कारवाईदरम्यान वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी छापा टाकून गांजाची झाडे उपटून नष्ट केली. जप्त करण्यात आलेल्या पिकाचे एकूण वजन तीन हजार 72 किलो असून त्याची अंदाजे किंमत सात कोटी 68 लाख रुपये इतकी आहे.

आरोपीविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल
या कारवाईदरम्यान आरोपी हुकला भिका पावरा (खंबाळे, ता.शिरपूर) याचे नाव निष्पन्न झाले असून वनपट्टा क्रमांक प्राप्त करीत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार तीन गुन्हे दाखल करण्यात आले.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपवनसंरक्षक धुळे (प्रादेशिक) मोहन नाईकवाडी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, सहायक वनसंरक्षक राहुल घरटे, कार्यकारी दंडाधिकारी महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे, वनपरिक्षेत्रीय अधिकारी विशाल दुसाणे, कैलास सोनवणे, सुनील जोग, किरण गिरवले, उपनिरीक्षक मनोज कचरे, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, उपनिरीक्षक मिलिंद पवार आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !