जळगाव तालुका हादरला : दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आई-वडिलांनीच दिला गळफास !

मोहाडीतील ’त्या’ आत्महत्येचा बनाव उघड : तीन संशयीतांना अटक


जळगाव (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी (ता.जळगाव) येथे गत महिन्यात घडलेल्या एका आत्महत्येच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 31 जुलै 2026 रोजी दुपारी दिड वाजता राधेशाम हरचंद राठोड (26) या युवकाने दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून सुरुवातीला एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र पोलीस तपासात हा प्रकार आत्महत्या नसून थेट ‘मर्डर’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले. जन्मदात्या आई-वडिलांनी आणि भावानेच संगनमत करून या तरुणाचा खून केला आणि त्याला आत्महत्येचे रूप देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा भयंकर बनाव रचल्याचे स्पष्ट झाले.

काय आहे प्रकरण ?
मयत राधेशाम राठोड याला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारूच्या नशेत घरी येऊन आपल्या आई-वडिलांना व भावाला मारहाण करत असे. त्याच्या या दैनंदिन छळाला आणि त्रासाला संपूर्ण कुटुंब पूर्णपणे कंटाळले होते. अखेर या त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आई-वडीलांसह भावाने एकत्र येत राधेशामचा काटा काढण्याचा कट रचला.


पुरावा नष्ट करण्यासाठी जाळली दोरी
31 जुलै रोजी दुपारी आरोपींनी आपापसात संगनमत करून राधेशाम यास दोरीच्या साह्याने गळफास दिला. हत्या केल्यानंतर ज्या दोरीने गळफास दिला ती दोरी तत्काळ जाळून टाकून त्यांनी हत्येचा मुख्य पुरावा नष्ट केला. यानंतर राधेशामने स्वतःच आत्महत्या केली असा खोटा कांगावा करत आरोपींनी पोलिसांना खोटी माहिती दिली आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला जरी हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला, तरी पोलिसांना संशय आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत, बारकाईने केलेल्या चौकशीत आरोपींचा खोटा बनाव कोसळला तपासाअंती हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर एम.आय.डी.सी.पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या संशयीतांना अटक
मुलाला संपवल्याप्रकरणी पोलिसांनी मृताची आई मीराबाई हरसिंग राठोड, मृताच वडील हरसिंग उर्फ हरचंद नथ्यु राठोड व मृताचा भाऊ सचिन हरसिंग राठोड (सर्व रा.मोहाडी, ता.जळगाव) यांना अटक केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !