पुणे रेल्वे स्थानकावर पोलीस शिपायावर जीवघेणा हल्ला
गांजा पिणार्यांना हटकल्याने कोयत्याने गळ्यावर वार ; अक्षय बांबल गंभीर जखमी
पुणे (बुधवार, 8 सप्टेंबर 2026) : पुणे रेल्वे स्थानक परिसरात गांजा पिणार्या तरुणांना हटकल्याच्या रागातून रेल्वे पोलीस शिपायावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोलिस शिपाई अक्षय बांबल गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या गळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय बांबल हे पुणे रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्यावर होते. यावेळी रेल्वे रुळांजवळ काही जण गांजा पित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संबंधितांना तेथून हटण्यास सांगितले. याचा राग आल्याने टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
हल्ल्यात धारदार कोयत्यासारख्या शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेल्वे परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पोलिस कर्मचार्यावरच रेल्वे रुळांजवळ हल्ला झाल्याने स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणार्यांवर कारवाई करताना पोलिसांवरच हल्ले होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
हल्लेखोरांचा शोध सुरू
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते, याचा तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

