अडावद पोलिसांची मोठी कारवाई : लाखो रुपयांचा गांजा जप्त
अडावद (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवझिरी गावालगतच्या शेतशिवारात तुरी पिकाआड फुलवलेल्या गांजा शेतीवर अडावद पोलिसांनी धडक कारवाई करीत लाखो रुपये किंमतीचे 175 गांजाची झाडे जप्त केली. डीवायएसपी सुनील पाटील व अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संशयीत देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
देवझिरी गावातील शेत-शिवारात तुरीच्या पिकाच्या आड गांजाची फुलवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने संबंधित शेतात कारवाई करत पाहणी केली असता तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून एकूण 175 गांजाची झाडे जप्त केली.

विशेष म्हणजे, कारवाई करण्यात आलेले शेत-शिवार मध्य प्रदेशच्या सीमेच्या जवळ असल्याने या कारवाईल महत्व आहे. या प्रकरणी पोलिसांनी देवसिंह बरेला याला ताब्यात घेतले असून जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांचे वजन व किंमत निश्चित करण्यासह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

