तामिळनाडूतील मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट : नशिराबादचा होमगार्ड ताब्यात
नशिराबाद (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मिडीयावर बनावट खाते तयार करीत त्यावर विविध व्हिडिओ पोस्ट करण्यासह अश्लील कमेंट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांनी नशिराबाद गावातील रहिवासी असलेल्या होमगार्डला ताब्यात घेतले आहे. शेख जुनेद कुतूबुद्दीन शेख असे ताब्यात घेतलेल्या कर्मचार्याचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण ?
समजलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट संशयीताने तयार केल्याचा यंत्रणेला संशय आहे शिवाय सोशल मिडीयातील या खात्यावर अश्लील कमेंट संशयीताने टाकल्याचा आरोपही असून 5 सप्टेंबर रोजी यंत्रणेने गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाला वेग दिला. डिजिटल कंटेंटच्या निर्मिती व प्रसारणामागील आय.पी.अॅड्रेस शोधत यंत्रणा नशिराबादमध्ये मंगळवार, 8 रोजी दाखल झाली.

चार अधिकार्यांच्या पथकाने संशयीताची केली चौकशी
सायबर निरीक्षकांसह चार अधिकार्यांच्या पथकाने संशयीत शेख जुनेद कुतूबुद्दीन शेख यास स्थानिक नशिराबाद पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. संशयीताची मोबाईलदेखील पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते.
अश्लील कमेंटप्रकरणी गुन्हा
मुख्यमंत्र्यांच्या नावाने अश्लील कमेंट तसेच फेक अकाउंट खाते उघडल्याप्रकरणी संशयीताला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयीताला पथकाने मंगळवारी सकाळी ताब्यात घेत चेन्नई येथे नेल्याचे सूत्रांनी सांगितले.
लवकरच येणार स्पष्टता
चेन्नईतील सायबर क्राईमचे पथक थेट नशिराबादमध्ये दाखल झाल्याने परिसरात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली. बनावट अकाउंट नेमके कुणी व कोणत्या उद्देशाने तयार केले ? एआय जनरेटेड व्हिडिओ आणि पोस्ट नेमक्या कोणत्या उद्देशाने प्रसारित करण्यात आल्या ? तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा आता सायबर तपासातून होण्याची शक्यता आहे.

