बनावट पीएमओ अधिकारी बनून पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश ; सशस्त्र अंगरक्षकासह दोघे ताब्यात
मुंबई(मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्याच्या पार्श्वभूमीवर बीकेसीतील एनएमएसीसी परिसरात सुरक्षा यंत्रणांना मोठी धक्कादायक बाब समोर आली. स्वतःला पीएमओ कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगणार्या रोहन पारेख (24) याला बनावट ओळखपत्रासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या खाजगी अंगरक्षकाकडे पिस्तूल आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली.
पोलिसांच्या तपासणीत पारेखचे पीएमओ ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल. बनावट ओळखपत्र कुठून मिळाले आणि कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.

बनावट ओळखपत्र आणि बंदुकधारी अंगरक्षक
रोहन पारेख (24) हा एनएमएसीसी संकुलात अत्यंत रुबाबात वावरत होता आणि स्वतः पंतप्रधान कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता. विशेष म्हणजे, त्याच्या संरक्षणासाठी त्याने स्वतःसोबत एक खासगी अंगरक्षकही (बॉडीगार्ड) ठेवला होता. पंतप्रधानांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा दल आणि मुंबई पोलिसांकडून परिसरात कडक तपासणी सुरू होती. त्यावेळी रोहन आणि त्याच्या अंगरक्षकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना रोखले. चौकशीदरम्यान रोहनने पोलिसांना पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र दाखवले मात्र सूक्ष्म तपासणीअंती ते ओळखपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. झडती घेतली असता त्याच्या अंगरक्षकाकडे एक लोड केलेली बंदूक (पिस्तूल) मिळून आल्याने सुरक्षा अधिकार्यांचे धाबे दणाणले.
व्हीव्हीआयपी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्याच्या अनुषंगाने बीकेसी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि कडक सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आला होता. अशा अत्यंत संवेदनशील ठिकाणी एक 24 वर्षांचा युवक बनावट ओळखपत्र आणि शस्त्रासह थेट कार्यक्रमाच्या आवारात कसा काय पोहोचला? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या सुरक्षा त्रृटीने यंत्रणांच्या कारभारावर प्रश्न निर्माण केले आहेत.

