बोदवड शहरात सकल हिंदू समाजातर्फे मूक निषेध मोर्चा

अल्पवयीनावर अत्याचार करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी


बोदवड (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : बोदवड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील गांधी चौकापासून बोदवड पोलीस ठाण्यावर सकल हिंदू समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. हा खटला जलद न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बोदवड ठाण्यावर मोर्चा
बोदवड तालुक्यातील एका गावातील अल्पयवीन विद्यार्थिनीवर खाजगी क्लास चालवणारा आरोपी शिक्षक अजीजखान पठाण याने अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर आरोपीविरोधात रोष वाढला होता. आरोपीविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आरोपी क्लास चालवत असलेल्या अनधिकृत इमारतीला तत्काळ पडावे या मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी एक वाजता सकल हिंदू समाजाकडून निषेध मूक मोर्चा काढण्यात आला.

यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात शहरातील शिक्षण संस्थांचे संचालक, व्यापारी, नागरिक, महिला, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, तसेच शालेय विद्यार्थिनी सहभागी झाल्या. मोर्चा पोलीस ठाण्यावर गेल्यानंतर त्याठिकाणी आलेल्या नागरिकांना श्याम चैतन्यगिरी महाराज (जामनेर), अमोल देशमुख, डॉ.उद्धव पाटील, ओम शिंदे (बुलढाणा), ह.भ.प.योगेश कोळी (जळगाव), तालुका स्वंयसेवक संघ चालक हरिओम जैस्वाल यांनी मार्गदर्शन केले. मागण्याचे निवेदन तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ, पोलीस निरीक्षक आशिष लवंगळे यांना देण्यात आले. मोर्चात मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाज बांधवांनी सहभाग घेतला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !