चाळीसगाव-जळगाव बसमधून दोन महिलांचे दिड लाखांचे मंगळसूत्र लांबवले
चाळीसगाव (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : चाळीसगाव-जळगाव बसमध्ये प्रवास करताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांचे प्रत्येकी पाच ग्रॅमचे मंगळसूत्र लांबवले. आजच्या बाजारभावानुसार या मंगळसूत्राची किंमत सुमारे दिड लाख रुपये असून चाळीसगाव शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
गर्दीचा फायदा घेत चोरी
मोनाली संदीप पाटील (29, घोडगाव, ता.भडगाव) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 8 रोजी सकाळी त्या चाळीसगाव स्थानकातून जळगाव जाणार्या बसमध्ये बसल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे मणी-मंगळसूत्र लांबवले. सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. याचवेळी रेखा शामसिंग पाटील यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवण्यात आले. पोलिसांनी जुन्या दरानुसार एकूण 15 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

वाढत्या चोर्यांमुळे महिलावर्गात घबराट पसरली आहे. महिलांनी प्रवासात आपले दागिने व रोकड सांभाळावी, असे आवाहन यंत्रेणने केले आहे. तपास निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण जाधव करीत आहेत.

