व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याला होकार ! भुसावळात समुपदेशक आरती चौधरी

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम


भुसावळ (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : आजच्या तरुण पिढीसमोर व्यसनाधीनतेचे वाढते आव्हान लक्षात घेता, विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन समुपदेशक आरती चौधरी यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने शहरातील शिवाजीनगर येथील डी.एल.हिंदी हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आरती चौधरी यांनी व्यसनांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले.

मित्रांच्या आग्रहातून अनेकदा व्यसनांची सुरूवात
व्यसनाची सुरुवात अनेकदा कुतूहल, मित्रांचा आग्रह किंवा चुकीच्या संगतीतून होते. मात्र, पुढे त्याचे रूपांतर सवयीत आणि त्यानंतर व्यसनाधीनतेत होऊ शकते. व्यसनामुळे केवळ आरोग्यावरच परिणाम होत नाही तर शिक्षण, कौटुंबिक जीवन आणि भविष्यातील प्रगतीवरही त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य संगत निवडावी, व्यसनांना ठामपणे नकार द्यावा आणि इतरांनाही व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करावे, असे आवाहन चौधरी यांनी केले.

यांची होती उपस्थिती
प्रारंभी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या अध्यक्षा यांनी क्लबच्या विविध सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमांची माहिती देत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गदर्शनपर सत्रात विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी ‘व्यसनाला नकार आणि निरोगी जीवनाला होकार’ देण्याचा सामूहिक संकल्प केला. या उपक्रमास क्लबच्या अध्यक्षा योगिता वायकोळे, सचिव कविता पाचापांडे, अनिता महाजन, हेमलता सोनार, अंजली जोशी, आदिती भडंग आदी सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य टेंभुर्णीकर, शिल्पा भुता, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !