स्थानिक गुन्हे शाखेची धडगाव हद्दीत मोठी कारवाई : गेंद्या शिवारातून 93 लाखांची गांजाची झाडे जप्त

सप्ताहात चौथी मोठी कारवाई : गांजा शेती फुलवणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ


नंदुरबार (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने गांजा शेती फुलवणार्‍यांविरोधात धडक कारवाईसत्र अवलंबले आहे. सप्ताहात चौथी मोठी कारवाई करण्यात आल्याने गांजा शेती फुलवणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकाने 93 लाख सहा रुपये किंमतीची सुमारे 186 किलो गांजाची झाडे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने धडगाव तालुक्यात दोन तर म्हसावद हद्दीत गांजाविरोधात कारवाई केल्याने तस्करांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ज्वारीच्या पिकाआड गांजा शेती
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेंदा गावाच्या शेतशिवारात एका व्यक्तीने ज्वारीच्या पिकामध्ये बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेंदा गावातील संबंधित शेतशिवाराची पाहणी केली असता ज्वारीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाची झाडे आढळून आली.

ज्वारीच्या आंतरपिकात गांजाची लागवड
पोलिसांच्या कारवाईत 93 लाख सहा रुपये किंमतीची 186 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे शेतात ज्वारीच्या आंतर पिकात गांजाची बेकायदेशीर लागवड करून त्याची जोपासना केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी निर्मल वनकर पावरा (गेंदा, पोस्ट चिखली, ता.धडगाव, जि.नंदुरबार) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पथकाची कारवाई
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार सजन वाघ, योगेंद्र सोनार, दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, स्वप्नील गोसावी, दत्तात्रय बागल, सचिन वसावे, पोलीस अंमलदार यशोदीप ओगले, शोएब शेख, सचिन सैंदाणे, भरत उगले आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !