फोर्टीफाइड तांदळाचा 78.63 लाखांचा साठा जप्त : पाचोरा तालुक्यात राईस मिलवर एफडीएची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने खळबळ : राईस मिलमध्ये आढळली उंदराच्या विष्ठेसह सर्वत्र अस्वच्छता


पाचोरा (मंगळवार, 8 सप्टेंबर 2026) : अन्न व औषध प्रशासनाने पाचोरा तालुक्यातील भोकरी, वरखेडी-पिंपळगाव रोड आणि भवरखेड येथील मे.श्री महासर माता राईस मिल येथे 7 ते 9 सप्टेंबरदरम्यान छापेमारी करीत महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित असल्याचा संशय असलेला फोर्टीफाइड तांदूळासह एकूण दोन लाख 96 हजार 476 किलो तांदळाचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत 78 लाख 63 हजार 150 रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.

अन्नसाठ्याचे घेतले नमूने
तपासणीदरम्यान एकूण सहा अन्न नमुने घेण्यात आले. जप्त केलेल्या साठ्यामध्ये 64 हजार 546 किलो फोर्टीफाइड राईस, एक लाख 37 लाख 996 किलो ब्रोकन राईस, एक हजार 996 किलो विनालेबल प्लेन राईस, तीन हजार 446 किलो मिसब्रँडेड ब्रोकन राईस, 81 हजार 496 किलो ‘गेस्टोलस’ एक्सपोर्ट राईस आणि सहा हजार 996 किलो पाच टक्के ब्रोकन राईस (मलेशिया एक्सपोर्ट) यांचा समावेश आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंध तपासणार
आस्थापना केंद्रीय अन्न परवानाधारक असल्याने या प्रकरणाची माहिती केंद्रीय अन्न परवाना प्राधिकरणास देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला फोर्टीफाइड तांदूळ महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे किंवा नाही याबाबत अन्न सुरक्षा अधिकार्‍यांकडून पुढील तपासणी सुरू आहे.

राईस मिलमध्ये अस्वच्छता ; खरेदीची बिलेही नाहीत
तपासणीदरम्यान आस्थापनेत उंदराची विष्ठा, धूळ, कोळ्यांची जाळी आढळून आली. तसेच तांदूळ जमिनीवर साठवून ठेवण्यात आल्याचे, तांदळाच्या पोत्यांवर उत्पादकाचा पत्ता नमूद नसल्याचे आणि खरेदीची बिले सादर न केल्याचेही निदर्शनास आले. या सर्व बाबींवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

अधिकार्‍यांच्या पथकाची कारवाई
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, सह आयुक्त (अन्न), ठाणे विभाग एस. एस. जाधव आणि सह आयुक्त (अन्न), नाशिक विभाग मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद म. पवार, आकाश कै. बोर्‍हाडे, किशोर आ. साळुंखे आणि योगराज कि. सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !