पाचोर्‍यातील दोन सराईत गुन्हेगार जळगावसह चार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा कडक पवित्रा


जळगाव (बुधवार, 9 सप्टेंबर 2026) : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. या कारवाईअंतर्गत पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना जळगावसह बुलडाणा, धुळे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या सराईतांवर कारवाई
पोलिसांच्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अजय तानाजी सोनवणे (भील) (28, रा.पुनगाव, ता.पाचोरा) विरोधात पाचोरा पोलिसात दोन गुन्हे दाखल असून दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे तसेच राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी (32, रा. आठवडे बाजार, पाचोरा, जि.जळगाव) याच्याविरुद्धही पाचोरा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दोन वर्षांसाठी संशयीत चार जिल्ह्यातून हद्दपार
मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 56(1)(2) अन्वये पाचोरा प्रांताधिकार्‍यांनी 7 सप्टेंबर रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी जळगाव, बुलडाणा, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे.

सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन
आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवणे या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलिसांकडून कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !