मास्कमधून सायबर फसवणुकीचे वास्तव मांडत बामणोदच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती


यावल (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस हायस्कूलमध्ये क्विकहील फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाढत्या ऑनलाइन फसवणुकींपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती देणे आणि त्यांच्यामध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना ओटीपी फसवणूक, संशयास्पद लिंक, बनावट कॉल व संदेश, सोशल मीडिया सुरक्षितता, पासवर्ड सुरक्षा आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर फसवणुकीचे प्रकार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व सोप्या पद्धतीने समजावेत यासाठी मास्कचा वापर करून सायबर गुन्हेगारांच्या भूमिकेतून विविध फसवणुकींची उदाहरणे सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांना फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना प्रभावीपणे समजल्या.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील टीना पाटील, दर्शना चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी या जनजागृती सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष उदाहरणे व मास्कच्या माध्यमातून सादर केलेल्या प्रात्यक्षिकामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमासाठी पीएसएमएस हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एस. हसबन व पर्यवेक्षक गणेश जावळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. बी.एम.लहासे यांनी आभार मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !