सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षा मंत्र : धरणगावात जनजागृती मार्गदर्शन व चर्चासत्र उत्साहात

फिशिंग, विशिंग, स्मिशिंगपासून ओटीपी व पासवर्ड सुरक्षिततेपर्यंत विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ; सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा संकल्प


धरणगाव (गुरुवार, 9 सप्टेंबर 2026) : शहरातील ए.सी.एस.आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, धरणगाव, जि.जळगाव येथे इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. बुधवार, 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1.15 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि डिजिटल सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या मार्गदर्शन सत्रात प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर माहिती दिली. दैनंदिन जीवनात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया तसेच विविध डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता, ऑनलाईन जगतात वावरताना प्रत्येकाने सजग आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फिशिंग, विशिंग, स्मिशिंगपासून सावध राहण्याचे आवाहन
मार्गदर्शनादरम्यान ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंग यांसारख्या सायबर गुन्ह्यांच्या विविध प्रकारांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश, ई-मेल अथवा संशयास्पद लिंक यांना प्रतिसाद देताना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला.

तसेच ओटीपी, पासवर्ड, बँकिंगविषयक माहिती आणि वैयक्तिक तपशील कोणाशीही शेअर करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, प्रत्येक खात्यासाठी वेगवेगळे पासवर्ड वापरणे तसेच द्विस्तरीय प्रमाणीकरण सुरू ठेवण्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

बनावट लिंक व क्यूआर कोडपासून सतर्कता
सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळणे, वैयक्तिक माहिती सार्वजनिक न करणे आणि डिजिटल गोपनीयतेचे संरक्षण करणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. बनावट लिंक, संशयास्पद क्यूआर कोड, आकर्षक ऑफर किंवा आमिष दाखविणारे संदेश यामुळे होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.

मोबाईलमध्ये कोणतेही अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता तपासणे, अनोळखी स्रोतांवरून अ‍ॅप्स डाउनलोड न करणे आणि आवश्यक नसलेल्या अ‍ॅप्सना वैयक्तिक माहितीची परवानगी न देणे, या सुरक्षा उपायांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

सायबर बुलिंग व डिजिटल गोपनीयतेवरही चर्चा
सत्रात सायबर बुलिंग, ऑनलाइन छळ, डिजिटल गोपनीयता आणि अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क या महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा करण्यात आली. सोशल मीडियावर कोणतीही माहिती, छायाचित्रे किंवा वैयक्तिक तपशील प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याच्या संभाव्य परिणामांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सायबर गुन्ह्यांना बळी पडण्यापेक्षा सायबर सुरक्षेविषयी जागरूकता, योग्य माहिती आणि वेळीच घेतलेली खबरदारी हेच प्रभावी संरक्षणाचे साधन असल्याचा संदेश या चर्चासत्रातून देण्यात आला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संवादात्मक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया वापर, पासवर्ड सुरक्षितता आणि डिजिटल गोपनीयतेसंदर्भात विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची आणि सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याची जाणीव निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचा तसेच स्वतःसोबतच कुटुंबीय व मित्रपरिवारालाही सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक करण्याचा संकल्प केला.

या विशेष मार्गदर्शन व चर्चासत्राच्या आयोजनासाठी ए.सी.एस. आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, धरणगाव, जि.जळगाव येथील प्राध्यापक व कर्मचारीवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !