पारोळा तालुका खुनाने हादरला : जुन्या वादातून मित्रालाच संपवले !
पारोळा (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : दोन्ही मित्रांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राला चाकूने संपवल्याची धक्कादायक व मन हेलावणारी घटना पारोळा तालुक्यातील पळसखेडे बुद्रुक शिवारात गुरुवार, 10 रोजी दुपारी घडली. या घटनेत मयूर दुर्वास पाटील (18) या तरुणाचा मृत्यू ओढवला. खुनानंतर संशयीत अंकुश नेहरू पाटील हा पसार असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
वादातून मित्राच्या पोटात मारला चाकू
मयत मयूर दुर्वास पाटील व संशयीत अंकुश नेहरू पाटील हे एकाच भागात राहणारे असून त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. याच जुन्या वादाच्या कारणावरून गुरुवारी दुपारी तीन ते पाच वाजेच्या सुमारास पळसखेडा शिवारातील रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी अंकुश पाटील याने त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशातून चाकू काढून मयूर पाटील याच्या पोटात वार केला. वार वर्मी बसल्याने मयूर गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.
संशयीताविरोधात खुनाचा गुन्हा
खून प्रकरण मयत मयूरचे वडील बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (45, रा. पळसखेडे बु.॥ ता.पारोळा) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पारोळत्त पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनानंतर संशयीत अंकुश नेहरू पाटील हा पसार असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

