वराडसीमला अडीच बाय तीन फुटांच्या खिडकीतून बैल कुदताच ग्रामस्थांचा जल्लोष
450 वर्षांची अनोखी परंपरा वराडसीमच्या विकास पाटील यांच्या बैलजोडीने पटकावला प्रथम क्रमांक
भुसावळ (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : बैलांच्या टापांचा आवाज… सजवलेल्या बैलांच्या अंगावरची झूल… आणि अवघ्या अडीच बाय तीन फुटांच्या खिडकीतून पोळा फोडण्यासाठी धावणारा बैल! हा थरार अनुभवण्यासाठी भुसावळ तालुक्यातील वराडसीमला पोळ्याच्या दिवशी अर्थात गुरुवार, 10 रोजी शेकडो ग्रामस्थांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. तब्बल साडेचारशे वर्षांची परंपरा जपणारा हा अनोखा पोळा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाच्या उत्सवात गावातील विकास पाटील यांच्या बैलजोडीने पोळा फोडण्यात प्रथम क्रमांक पटकावला.
450 वर्षांची परंपरा
शेतकर्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीचा साथीदार नव्हे तर कुटुंबातील सदस्याचे स्थान आहे. वर्षभर शेतात राबणार्या या मुक्या जीवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोळा सण साजरा केला जातो. भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथेही पारंपरिक उत्साहात पोळा साजरा करण्यात आला.
खिडकी उघडताच थरार
गुरुवारी दुपारी तीन वाजता वराडसीमला पोळा उत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आजही शेकडो वर्षांपूर्वीपासून चालत आलेली अनोखी परंपरा. यंदाचा नंदी लक्ष्मण लोखंडे यांचा होता. पारंपरिक विधीनुसार नंदीला प्रथम दरवाजाबाहेर सोडण्यात आले आणि दरवाजा बंद करण्यात आला. त्यानंतर समोरची अवघी अडीच बाय तीन फूट आकाराची खिडकी उघडण्यात आली. खिडकी उघडताच बैलाने आत प्रवेश करण्यासाठी घेतलेली झेप पाहून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. बैल पोळा फोडताच परिसरात जल्लोष झाला. ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरा आणि थरार यांचा अनोखा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
विकास पाटील यांच्या बैलाचा दमदार विजय
या पारंपरिक स्पर्धेत विकास पाटील यांच्या बैलाने प्रथम क्रमांक पटकावला तर जोगलखोरीच्या शरद चौधरी यांच्या बैलाने द्वितीय तर स्थानिक कुमारसिंग नामदेव पाटील यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळविला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस भुसावळ तालुक्याचे परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या हस्ते, तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस भास्कर चौधरी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
परंपरेसोबत शेतकरी संस्कृतीचा जागर
पोळ्याच्या निमित्ताने वराडसीम गावात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सजवलेले बैल, पारंपरिक वेशभूषेतील शेतकरी, ढोल-ताशांचा गजर आणि स्पर्धेचा थरार यामुळे गावाचे वातावरण भारावून गेले होते. आधुनिकतेच्या वेगवान युगातही साडेचारशे वर्षांची परंपरा जिवंत ठेवत बैल आणि शेतकर्याच्या नात्याची जपणूक करणारा वराडसीमचा पोळा यंदाही सर्वांचे लक्ष वेधून गेला. या उत्सवातून केवळ सण साजरा झाला नाही तर शेतकरी संस्कृती, परंपरा आणि मुक्या जीवांप्रती असलेली कृतज्ञता यांचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला गेला.

