भुसावळातील नगरपालिका शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा : समस्या न सुटल्यास मनसेचा आंदोलन इशारा
भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : भुसावळ नगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पालिका प्रशासनाचे लक्षात आणून दिले. शहरातील शाळा क्रमांक दोनमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना तासनतास जमिनीवर बसावे लागत असून समस्या सोडवण्याची मागणी स्थानिक मनसे पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली.
पालिका शाळांमध्ये सुविधांचा बोजवारा
गरिबांची मुले मोठ्या आशेने पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात मात्र काही शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे, मुलींसाठी सुरक्षित शौचालयांचा अभाव तसेच अस्तित्वातील शौचालयांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असणे, अशा गंभीर समस्या असल्याचे मनसेने म्हटले आहे. शाळांच्या आवारात नियमित स्वच्छता होत नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
डिजिटल शिक्षणाच्या काळात मूलभूत सुविधांचा अभाव
एकीकडे डिजिटल शाळा आणि आधुनिक शिक्षणावर भर दिला जात असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित शौचालय यांसारख्या प्राथमिक सुविधा मिळत नसतील, तर ही बाब चिंताजनक असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
मनसेच्या या आहेत मागण्या
मनसेतर्फे मुख्याधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ, भुसावळ यांना दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या. त्यात शाळा क्रमांक दोन मध्ये विद्यार्थ्यांसाठी तातडीने बेंच उपलब्ध करून द्यावेत, शाळांमध्ये आरओ फिल्टरद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मुलींसाठी सुरक्षित व दरवाजे असलेली स्वतंत्र शौचालये उपलब्ध करून द्यावीत, सर्व नगरपालिका शाळांमध्ये नियमित स्वच्छता व्यवस्था करावी, शाळांमध्ये सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करावी, ज्या शाळांना स्वतंत्र पटांगण उपलब्ध नाही, तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जीर्ण व धोकादायक अवस्थेतील शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित कराव्यात, काही शाळांमध्ये वर्ग खोल्यांमध्येच पोषण आहार तयार केला जात असल्याने, मुख्य इमारतीपासून सुरक्षित अंतरावर शासनाच्या निकषांनुसार बांधलेल्या स्वयंपाकघरातच पोषण आहार तयार करण्याच्या सूचना द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.
या पदाधिकार्यांची उपस्थिती
मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे व जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन भुसावळ शहराध्यक्ष दीपक सोनवणे, प्रणय भागवत, मनविसे तालुकाध्यक्ष, विलास कोळी (तालुका सचिव), सुशील मोरे, राहुल कोळी, दशरथ सपकाळे आदींनी दिले.

