भुसावळात डी.एस.हायस्कूल संकुलातील स्लॅबचा भाग कोसळला : सुदैवाने टळली प्राणहानी
जीर्ण पॅरापेट वॉलने पावसाळ्यात मोठ्या अपघाताचा धोका
भुसावळ (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : भुसावळ शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोरील डी.एस.हायस्कूलला लागून असलेल्या महात्मा गांधी संकुलातील वरच्या मजल्यावरील पॅरापीट अत्यंत जीर्ण झाल्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काही भाग दुकानांच्या छतावर कोसळला. सुदैवाने यावेळी ग्राहक वा कर्मचारी नसल्याने मोठी प्राणहानी टळली. या प्रकारानंतर व्यापारी व गाळे धारक संतप्त झाले असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. गतवर्षीय गाळे धारकांनी जीर्ण पॅरापीटची दुरुस्तीची मागणी केली मात्र पालिकेने या मागणीकडे डोळेझाक केली.
काय घडले शहरात?
डी.एस.हायस्कूलला लागून महात्मा गांधी संकुल आहे. या संकुलात चाजनीज,आईस्क्रीम तसेच अन्य विक्रेत्यांची दुकाने आहेत. या दुकानांवर सिमेंट काँक्रीटच्या जीर्ण पॅरापेट वॉलमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी, नगरपरिषद भुसावळ यांना 14 जुलै 2025 रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी संकुलाच्या तिसर्या मजल्यावरील गच्चीवरील काँक्रीटची पॅरापेट वॉल मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्याने ती जमिनीवर कोसळून हानी होण्याची भीती वर्तवण्यात आली होती व पालिकेकडे दुरुस्तीची अपेक्षा करण्यात आली मात्र वर्ष होवूनही पालिकेने दखल घेतली नाही.
रस्त्यावर कोसळले सिमेंटचे तुकडे
शुक्रवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास जीर्ण पॅरापीट (पडती) चा काही ओम चायनीजच्या दुकानाला लागून असलेल्या तीन दुकानांच्या पत्र्यावर कोसळला. सुदैवाने यावेळी खाली कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली तर एका दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले. या प्रकारानंतर व्यावसायीक गाळेधारक संतप्त झाले असून त्यांनी तातडीने या पॅरापीटची दुरुस्ती करण्याची व अपघात थांबवण्याची मागणी केली आहे.

