धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : बनावट दारूसह 30 लाखांचा अफू साठा जप्त


धुळे (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयीताच्या घरातून बनावट देशी दारूचा साठा तसेच सुकलेल्या बोंडाचा चुरा (अफू) मिळून एकूण 29 लाख 41 हजार 870 रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना एका संशयीताच्या घरात बनावट दारूसह अफूचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. पथकाने मोहाडी उपनगर, ता.धुळे परिसरातील गंभीर माणिक गावडे (54, प्लॉट नंबर 54, कै.संजयभाऊ नगर, मोहाडी, ता.धुळे) याच्या घराची झडती घेतली असता खसखसच्या (अफू) सुकलेल्या बोंडांचा 163 किलो 83 ग्रॅम वजनाचा व अंदाजे 27 लाख 85 हजार 110 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला तसेच बनावट टँगो पंच दारूचे दोन खोके, एक लाख रुपये किंमतीचे बनावट दारू बनवण्याचे इलेक्ट्रिक बॉटलिंग मशीन, 50 हजार रुपये किंमतीचे डोडा पावडर बनवण्याचे इलेक्ट्रीक ग्राईंडर मशीन तसेच एक हजार रुपये किंमतीचा इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण 29 लाख 41 हजार 870 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके, उपनिरीक्षक अमित माळी, ग्रेडेड उपनिरीक्षक शाम निकम, अंमलदार सतीश जाधव, शिरीष भदाणे, संदीप पाटील, सचिन गोमसळे, हेमंत बोरसे, सुरेश भालेराव, नितीन दिवसे, चालक दिलीप वाघ, अंमलदार राणी दामोदर आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !