बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरण : सिया-चेतननंतर आता तिसर्या आरोपीला बेड्या
पुणे/लोणावळा (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : लोहगडावरील खोल दरीत बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल याला ढकलून देत हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणात तपासाला महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली आहे. घटनेनंतर तब्बल 79 दिवसांनी पोलिसांनी रितेश हंगे (रा. बीड) याला अटक केली आहे. तो मुख्य संशयित चेतन चौधरीचा जवळचा मित्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यासह रितेश हंगे याचाही या हत्याकांडात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी रितेशपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले.
डिजिटल पुराव्यांनी उलगडला हत्येचा घटनाक्रम
हत्येच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांकडून जप्त केलेले मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, पेनड्राइव्ह आणि हार्डडिस्क सायबर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते.
फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तब्बल आठ हार्डडिस्कचा सखोल तपास केला. त्यातून मिळालेल्या डिजिटल डेटामध्ये चेतन चौधरी, रितेश हंगे आणि सिया गोयल यांच्यातील संपर्क, ऑडिओ संभाषणे तसेच मोबाइल चॅटिंगशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली.
या डिजिटल पुराव्यांच्या आधारे संशयितांमधील परस्पर संपर्क आणि घटनाक्रम तपासण्यास पोलिसांना मदत झाली. त्यातूनच रितेश हंगे याचा कथित सहभाग समोर आल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
डिलीट केलेला डेटा शोधण्याचे आव्हान
सायबर तपासात आरोपींकडून मोबाइल अथवा इतर डिजिटल उपकरणांमधील माहिती डिलीट केली जाते. मात्र, माहिती डिलीट केल्यानंतर ती लगेचच कायमची नष्ट होते असे नाही. तांत्रिक पद्धतींच्या साहाय्याने उपलब्ध डेटामधून अनेकदा महत्त्वाचे पुरावे पुन्हा मिळवता येतात मात्र, डिलीट केलेल्या डेटाच्या जागेवर नवीन माहिती सेव्ह झाल्यास ‘ओव्हरराइट’ होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पूर्वीचा डेटा पुनर्प्राप्त करणे अधिक कठीण होते.
चॅटिंग, लोकेशन आणि संपर्क ठरले महत्त्वाचे
सायबर फॉरेन्सिक तपासातून उपलब्ध झालेल्या माहितीचे वर्गीकरण करून चॅटिंग, मोबाइल लोकेशन, कॉल आणि संपर्कांचे विश्लेषण केले जाते. या तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित व्यक्तींच्या हालचाली आणि त्यांच्यातील संपर्कांचा घटनाक्रमाशी संबंध जोडण्यास तपास यंत्रणेला मदत मिळते.
सायबर तज्ज्ञ संदीप गदिया यांच्या मते, डिलीट केलेली माहिती प्रत्येक वेळी पूर्णपणे नष्ट होतेच असे नाही. मात्र त्यावर नवीन डेटा सेव्ह झाल्यास पुनर्प्राप्तीची शक्यता कमी होते. उपलब्ध तांत्रिक साधनांच्या मदतीने चॅटिंग, लोकेशन आणि संपर्कांचे विश्लेषण करून घटनाक्रम उभा करता येतो. रितेश हंगेच्या अटकेमुळे या प्रकरणातील तपासाला नवी दिशा मिळाली असून, त्याची भूमिका आणि इतर संशयितांशी असलेला संपर्क याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

