पुणे गणेशोत्सवातील 10 दिवसांची दारूबंदी अखेर रद्द

‘फक्त पुण्यातील लोकच दारू प्यायल्यानंतर गैरवर्तन करतात का?’ हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले


मुंबई (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सवाच्या काळात पुणे जिल्ह्यात सलग दहा दिवस दारूबंदी लागू करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ पुणे जिल्ह्यातच अशा प्रकारची बंदी का, असा सवाल करत न्यायालयाने प्रशासनाच्या निर्णयावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. न्यायालयाच्या सुनावणीनंतर पुणे जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचा दारूबंदीचा आदेश मागे घेतला आहे.

मुख्य न्यायमूर्ती एम.सी.त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मुंबईसह राज्यातील इतर भागांत अशा स्वरूपाचे निर्बंध नसताना केवळ पुण्यालाच लक्ष्य का केले जात आहे, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

‘फक्त पुण्यातील लोकच दारू प्यायल्यानंतर गैरवर्तन करतात का?’
गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला असला, तरी त्याची व्याप्ती आणि अंमलबजावणीबाबत न्यायालयाने प्रशासनाला जाब विचारला. फक्त पुण्यातील नागरिकच मद्यपान केल्यानंतर गैरवर्तन करतात का? असा सवाल न्यायालयाने केला.

एका जिल्ह्यावर अशा प्रकारे सरसकट निर्बंध लादल्याने पुणे आणि तेथील नागरिकांना वेगळे ठरवले जात असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

व्यावसायिकांवर सरसकट बंदी योग्य नाही
परवानाधारक मद्यविक्रेत्यांना सलग दहा दिवस व्यवसाय करण्यापासून रोखणारा सरसकट आदेश देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था राखताना नागरिकांच्या तसेच परवानाधारक व्यावसायिकांच्या हक्कांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

‘दहा दिवस दारू न मिळाल्यास रुग्णालयांत गर्दी होईल’
सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी यांनी व्यसनाधीन व्यक्तींवर अचानक दारूबंदीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली. दहा दिवस मद्य उपलब्ध न झाल्यास काही व्यसनाधीन व्यक्तींना आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यातून रुग्णालयांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, असे न्यायालयाने उपरोधिक शैलीत नमूद केले.

आता केवळ दोन दिवस ‘ड्राय डे’
उच्च न्यायालयाच्या फटकारणीनंतर पुणे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवातील दहा दिवसांची दारूबंदी मागे घेतली आहे. त्यामुळे आता पुण्यात पूर्वीप्रमाणे केवळ 14 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर हे दोन दिवस ‘ड्राय डे’ राहणार आहेत.

 

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !