शिरपूरात धूम स्टाईल चैन स्नॅचिंग : भुसावळातील कुख्यात आशू अली इराणीसह दोघे जाळ्यात

शिरपूरसह राज्यातील नऊ गुन्ह्यांची नव्याने उकल : 30 ग्रॅमची लगड जप्त


शिरपूर (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगलपोत धूम स्टाईल लांबवत राज्यभरात धुमाकूळ घालणार्‍या भुसावळातील कुख्यात आशु उर्फ हसन अली नियाज अली इराणी (रा.पापा नगर, रजा टॉवरजवळ, भुसावळ, जि. जळगाव) याच्यासह त्याची पत्नी फातीमा हसन अली इराणी हिला शिरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या अटकेनंतर शिरपूर शहर हद्दीतील दोन तर अन्य राज्यभरातील सात गुन्ह्यांची नव्याने उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. विशेष म्हणजे कुख्यात आशू अली इराणीविरोधात राज्यभरात यापूर्वी 26 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिरपूरात धूम स्टाईल दोन चोर्‍या
24 जुलै 2026 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शिरपूर शहरातील कॉलनी परिसरात मीना कैलास अग्रवाल (61, हिरानगर, शिरपूर) आणि मीराबाई आसाराम धनगर (गायत्री कॉलनी, शिरपूर) या दोघी पायी घरी जात असताना काळ्या रंगाच्या बुलेट मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगलपोत जबरदस्तीने हिसकावून नेल्या होत्या. अग्रवाल यांची आठ ग्रॅम वजनाची तर धनगर यांच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या मंगलपोत चोरीस गेल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजवरून पटली ओळख
शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तपासाची सूत्रे हाती घेत घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून तपास सुरू केला. या तपासात गुन्ह्यात भुसावळातील आशू उर्फ हसन अली इराणी (पापा नगर, रजा टॉवरजवळ, भुसावळ) आणि त्याचा साथीदार सादीक अली इबादत अली इराणी (भुसावळ) यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी वेश बदलत आरोपीला ठोकल्या बेड्या
आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक भुसावळात दाखल झाले मात्र पोलिसांचा सुगावा लागताच आरोपी पसार झाला. त्यानंतर संशयीत फैजपूरात असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तेथेही शोध घेतला मात्र तेव्हादेखील आरोपी पसार झाला मात्र सावदा, उदळी, काहुरखेडा मार्गाने शोध घेत असताना संशयीत मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथील बिस्मिल्ला हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वेशभूषा बदलून हॉटेल गाठत तेथे बसलेल्या आशू उर्फ हसन अली इराणी याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, आरोपीचा साथीदार सादीक अली इबादत अली इराणी याचा अपघात झाल्याने तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटकेनंतर पोलीस कोठडीत फोडले डोके
आरोपी आशू उर्फ हसन अली नियाज अलीला शिरपूर पोलिसांनी अटक करून पीसीआर घेतल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने भिंतीवर डोके आपटून घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात स्वतंत्र गुन्हादेखील दाखल केला.

चोरीचे सोने विक्री : पत्नीलाही पडल्या बेड्या
आरोपी आशू उर्फ हसन अली नियाज अलीने चोरीचा मुद्देमाल पत्नी फातीमा हसन अली इराणीला दिल्याची कबुली दिल्यानंतर पथकाने तिची चौकशी केली असता तिनेही उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी तिला अटक केली व चौकशीत तिने चोरीचा मुद्देमाल भुसावळातील ओम जयबहादूर ठाकूर यांच्याकडे विक्री केल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने सराफाकडून सात, आठ व 15 ग्रॅम वजनाची मिळून एकूण 30 ग्रॅमची लगड जप्त केली.

नव्याने नऊ गुन्ह्यांची उकल
आरोपी आशू उर्फ हसन अली नियाज अलीने अटकेनंतर पोलीस चौकशीत शिरपूर शहर हद्दीत दोन गुन्हे केल्याची तसेच धुळ्यातील देवपूर व चाळीसगाव रोड हद्दीत दोन तर नंदुरबार उपनगर, जालना जिल्ह्यातील सदर बाजार, चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर हद्दीत दोन तर जळगावच्या एमआयडीसी हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे आरोपी विरोधात यापूर्वीच राज्यभरात तब्बल 26 गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यांनी केली धडाकेबाज कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक जितेंद्र महाजन, अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, आरीफ तडवी, सचिन वाघ, गोविंद कोळी, मनोज महाजन, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, भटू साळुंखे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, सोमा ठाकरे, निलेश चौधरी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !