सणासुदीपूर्वी एफडीएची राज्यभर धडक ; साडेचार कोटींचे 95 टनांहून अधिक खाद्यपदार्थ जप्त
बटर, पनीर, खवा, बर्फीसह 172 लिटर दूध कारवाईच्या कचाट्यात ; जप्त मालाची किंमत 4.45 कोटी
मुंबई (रविवार, 13 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर मोठी मोहीम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांत अहिल्यानगर, पुणे, नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यांत करण्यात आलेल्या तपासणी व कारवाईत बटर, पनीर, खवा, बर्फी आणि इतर खाद्यपदार्थ मिळून 95 टनांहून अधिक साठा तसेच 172 लिटर दूध जप्त करण्यात आले आहे. या कारवाईतील जप्त मालाची एकूण किंमत सुमारे 4.45 कोटी आहे.
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा नियमांचे उल्लंघन करून साठवलेले पदार्थ बाजारात येऊ नयेत, यासाठी ऋऊ- कडून ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
अहिल्यानगरमध्ये कोल्ड स्टोरेजवर छापा
अहिल्यानगरमध्ये एफडीए अधिकार्यांनी एका कोल्ड स्टोरेजवर धडक देत 75,368 किलो पाश्चराइज्ड अनसॉल्टेड कुकिंग बटर जप्त केले. या साठ्याची बाजारातील किंमत सुमारे 3.95 कोटी असल्याचे सांगण्यात आले. साठ्याच्या गुणवत्तेबाबत तसेच लेबलिंगमध्ये नियमांचे पालन झाले नसल्याचा संशय अधिकार्यांना आला. त्यानंतर संबंधित साठा सील करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
पुण्यात दोन वाहनांवर कारवाई
पुण्यात एफडीए पथकाने सणासुदीच्या काळात विक्रीसाठी नेण्यात येणार्या दोन वाहनांची तपासणी केली. या वाहनांमध्ये पनीर, खवा, दही आणि अन्य दुग्धजन्य पदार्थ आढळून आले. तपासणीदरम्यान या पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांमध्ये आवश्यक तापमान नियंत्रणाची व्यवस्था नसल्याचे आढळले. कर्नाटकातून आणण्यात आलेल्या पनीरसंदर्भात आवश्यक बिलेही उपलब्ध नव्हती.याशिवाय काही पदार्थ सील नसलेल्या पॉलिथिनमध्ये ठेवण्यात आले होते. पॅकिंगवर आवश्यक माहिती असलेली लेबले नसल्याचेही अधिकार्यांच्या निदर्शनास आले.
पहिल्या वाहनातून 24 नमुने घेण्यात आले. त्यातून 7,362 किलो पनीर व अन्य खाद्यपदार्थ, सुमारे 17.15 लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला. दुसर्या वाहनातून 12 नमुने घेण्यात आले असून 6,081 किलो पनीर जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत सुमारे 14.55 लाख आहे.
पुण्यात 4,627 किलो खवा जप्त
पुण्यातील पेठ परिसरातील के. बी. अग्रवाल येथे 9 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत स्त्रोताची माहिती उपलब्ध नसलेला 4,627 किलो खवा आढळून आला. त्याची किंमत सुमारे 11.56 लाख होती. एफडीएने हा संपूर्ण साठा जप्त करून नंतर त्याची विल्हेवाट लावली पुणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण 18 हजार 70 किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईत 69 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून जप्त मालाची किंमत सुमारे 43.27 लाख आहे.
नाशिकमध्ये गुजरातमधून येणारी 1,955 किलो बर्फी जप्त
नाशिकमध्येही एफडीएने मोठी कारवाई केली. गुजरातमधून आणली जात असलेली 1,955 किलो बर्फी अधिकार्यांनी जप्त केली. या साठ्याची किंमत सुमारे 5.58 लाख असल्याचे सांगण्यात आले.
बुलढाण्यात दूध केंद्रात नियमांचा बोजवारा
बुलढाणा जिल्ह्यातील यरली येथील दूध केंद्राची तपासणी करण्यात आली. या तपासणीत केंद्राच्या नोंदणी, स्वच्छता आणि आवश्यक नोंदींमध्ये अनेक त्रृटी आढळून आल्या. कारवाईदरम्यान 172 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.
नव्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एफडीएची कारवाई तीव्र
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील कारवायांना वेग आल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांत एफडीएकडून एक हजार 100 हून अधिक छापे टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. याच काळात 165 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बनावट पनीर विरोधातही राज्यभर कठोर भूमिका घेण्यात आली आहे. अगदी उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनमध्येही तपासणी करण्यात आल्याने एफडीएच्या कारवाईची चर्चा झाली होती.

