भुसावळ नगरी सजली ; गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी!
आज शहरासह ग्रामीण हद्दीत 266 मंडळांमध्ये होणार श्रींची स्थापना : उत्सवानिमित्त बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण
भुसावळ (सोमवार, 14 सप्टेंबर 2026) : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत असल्याने भुसावळ शहरासह ग्रामीण भागात उत्साहाला उधाण आले आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत रविवारी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींच्या स्थापनेसाठी अंतिम तयारी सुरू असून सोमवार, 14 सप्टेंबर रोजी शहरातील 266 गणेश मंडळांमध्ये श्रींची प्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात होत आहे. दरम्यान, शहरातील विविध भागांत दिडशेहून अधिक मूर्ती विक्री केंद्रे थाटण्यात आली असून तब्बल 30 हजारांहून अधिक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
पावसातही भाविकांचा खरेदीसाठी उत्साह
रविवारी दिवसभर शहरात रिपरिप पाऊस असलातरी भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. श्रींची मूर्ती खरेदी करण्यासह पूजेचे साहित्य, हार, लायटींग तसेच विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी शहराच्या बाजारपेठेत मोठी गर्दी झाली हेाती. यंदा अमेरिकन डायमंड हारला मोठी मागणी राहिली याशिवाय वेलवेटची आसने, डिझायनर पाठ, फुलांचे तोरण, मोत्यांच्या माळा, गुलाबाच्या माळा, कृत्रिम फुले, जास्वंद, मोगरा आणि वेली यांसह विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध असल्याने तेदेखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली तसेच गणरायासाठी विविध रंग व आकारांतील फेटेही दाखल झाले असून त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.



सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप, मखर, पडदे, विद्युत रोषणाई आणि देखाव्यांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पावसाची पर्वा न करता कार्यकर्ते रविवारी दिवसभर सजावटीच्या कामात व्यस्त होते. गणेशभक्तांच्या स्वागतासाठी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले असून, सोमवारपासून शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.
पर्यावरण पूरक मूर्तींना मागणी
शहरात आयोजित करण्यात आलेल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मूर्ती रंगवून यंदा आपल्या घरात त्यांची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरविणार्या कुटुंबांची संख्या वाढताना दिसून आली.
साहित्य व वस्तू विक्रीतून लाखोंची उलाढाल
विघ्नहर्त्याच्या उत्सवामुळे बाजारपेठेतही चैतन्य पहायला मिळाले. छोट्या-मोठ्या विक्रेत्यांमध्ये उत्साह वाढला असून शहरातील विविध भागात सुमारे शंभराहूनअधिक सजावटीच्या साहित्याची दुकाने व स्टॉल लावण्यात आल्याचे दिसून आले. जळगाव, इंदौरसह दिल्ली, मुंबइ आदी भागातून विक्रेत्यांनी विविध साहित्य मागविल्याचे सांगण्यात आले.
मिरवणुकांमुळे वाहतुकीत तात्पुरते बदल
गणेशमूर्ती स्थापनेच्या मिरवणुका सुरू होणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. जामनेर रोडवर मिरवणूक सुरू असताना एका बाजूची वाहतूक बंद ठेवून दुसर्या लेनमधून दोन्ही दिशांची वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची मोटारसायकल गस्त तसेच अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मिरवणुकीच्या मार्गानुसार काही रस्त्यांवरील वाहतूक काही काळासाठी वळविली जाऊ शकते, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक राहुल भंडारे यांनी दिली.
227 मंडळांना परवानगी ; उर्वरित प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप, मिरवणूक, ध्वनिवर्धक आदींसाठी आवश्यक परवानग्या ऑनलाइन पद्धतीने घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मंडळांच्या पदाधिकार्यांनी परवानगीची प्रक्रिया सुरू केली असून, 266 पैकी 227 गणेश मंडळांनी आतापर्यंत आवश्यक परवानगी घेतली आहे. उर्वरित मंडळांची परवानगी प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
