‘उजेड पेरणारी माणसं’ : खान्देशातील सांस्कृतिक दस्तऐवज
प्रज्ञा हंसराज बागुल
(वासिंद, ठाणे)
भुसावळ (सोमवार 14 सप्टेंबर 2026) : दैनिक दिव्य मराठी जळगाव आवृत्तीचे डेप्युटी न्यूज एडिटर आनंदा पाटील यांचे पहिले पुस्तक ‘उजेड पेरणारी माणसं’ पेन पब्लिकेशन पुणे यांनी 29 जुलै 2026 रोजी प्रकाशित केले आहे. सदरचे पुस्तक म्हणजे बापाच्या इच्छापुर्तीसाठी मुलाने स्वीकारलेला वैचारिक वारसा आहे.



खान्देशातील सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या संदर्भ घेऊन साहित्यिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे उल्लेखनीय पुस्तक आहे. वाढदिवस, सेवापूर्ती. गौरव सोहळ्यात भेट देण्यासाठी हे पुस्तक सर्वोत्तम आहे. कारण त्यातील प्रत्येक पान नवा संदेश आणि प्रेरणा देणारे आहे.
एकूण चौर्यांशी व्यक्तीरेखांचा आढावा सखोल आणि सूक्ष्म दृष्टीकोनातून लेखकाने घेतला आहे. अशा पुस्तकाची दखल अभ्यासक्रम निवड समितीने संदर्भ म्हणून अवश्य घेतली पाहिजे. कारण येणार्या पिढीसाठी सदरचे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरेल असे सृजनात्मक लेखन ठरले आहे.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सांगीतिक चळवळीचा समर्पित कार्यकर्ता अशी प्रतापसिंग बोदडेंची ओळख. राज्य शासनाने समाजभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले होते. ‘हा जखमी देह बुध्दाला वाहिला’, ‘भीमराज की बेटी मै तो जयभीमवाली हूँ’ अशी त्यांची गाणी गाजली.
महान व्यक्तीमत्वाच्या कार्याचा आढावा सखोलपणे या पुस्तकात घेतला आहे. चित्रकार पिसुर्वो : जितेंद्र सुरळकर, प्रबोधनाचा झरा : सारंग पवार, वाघुरकाठचा कवी : नामदेव कोळी, उद्योजक लेखक : अरूण नारखेडे, विद्वतेचे वारसदार : विकास पाटील, विनोदवीर : प्रा. अनिल सोनार, धातूशिल्पकार : संतोष साळवे, वेटर डॉक्टर : डॉ. मिलिंद बागुल, ध्यासवंती प्रवासी : प्रेमचंद कोटेचा, कबड्डी महर्षी : अरूण मांडळकर अशा एकूण चौर्यांशी व्यक्तीमत्वांचा सखोल परिचय लेखातून करून दिला आहे.
अभ्यासू, सूज्ञ वाचकांनी अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असे सुंदर मुखपृष्ठ असलेले मोटीवेशनल पुस्तक म्हणजे ‘उजेड पेरणारी माणसं’ हे आहे.
