जळगाव हादरले : पाच वर्षीय चिमुकल्यासह विवाहितेची आत्महत्या
गणेश चतुर्थीच्या दिवशी शहरातील तळेले कॉलनीतील धक्कादायक घटना
जळगाव (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाचा सर्वत्र उत्साह संचारला असतानाच जळगावातून मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या पाच वर्षीय मुलाला साडीने गळफास देत विवाहितेने मृत्यूला कवटाळले. जळगावच्या तळेले कॉलनीत सोमवारी सायंकाळी समोर आलेल्या या घटनेने समाजमन हळहळले आहे. हेमांगी निखील महाजन (29 जुना खेडी रोड, तळेले कॉलनी, जळगाव) व मुलगा शौर्य महाजन (5) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समोर आले नाही.
माय-लेकांच्या आत्महत्येने हळहळ
जळगाव तळेले कॉलनी परिसरात महाजन कुटुंबीयांच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू होती. कुटुंबातील सदस्य पूजेच्या तयारीमध्ये व्यस्त असताना हेमांगी महाजन या पाच वर्षीय शौर्यसह खालच्या मजल्यावरील खोलीत गेल्या व त्यांनी आधी मुलगा शौर्यला साडीने गळफास दिला व नंतर स्वतःदेखील साडीने गळफास घेतला. कुटुंबीय त्यांना बोलावण्यासाठी खोलीकडे गेले असता दरवाजा बंद असल्याचे आढळले व खिडकीतून डोकावताच हा धक्कादायक प्रकार समोर आला.



शनिपेठ पोलिसांची धाव
घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर हेमांगी महाजन आणि त्यांचा मुलगा शौर्य यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी दोघांनाही मृत घोषित केले.
हेमांगी महाजन यांचे माहेर बांभोरी, ता.धरणगाव येथील असल्याची माहिती असून त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांचे पती निखील महाजन हे सैन्य दलात कार्यरत असून सध्या राजस्थान ला सेवेत असल्याची माहिती मिळाली. गणेशोत्सवाच्या दिवशीच महाजन कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि परिचितांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार गणेश नायकर करीत आहेत.
