शिरपूर-चोपडा रस्त्यावर भीषण अपघातात चौघे ठार
भरधाव ट्रॉलाने दुचाकीला उडवले : मयत मध्यप्रदेशातील रहिवासी
शिरपूर (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : मध्यप्रदेशातील मजूर एकाच दुचाकीवरून महाराष्ट्रात कामासाठी येत असताना भरधाव ट्रॉलाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघांचा जागीच तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा भीषण अपघात शिरपूर-चोपडा रस्त्यावर सावेर फाट्याजवळ मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडला.
चौघांचा अपघातात मृत्यू
सुरेश भिलाला (26, रा.बाल्या, ता.बडवाह, जि.खरगोन), लुमरिया अहिरवाल (भिलाला, 25, रा.बुद्रा, ता.राजपूर, जि.बडवाणी) यांचा जागीच मृत्यू झाला तर इसराम अहिरवाल (40, रा.बुद्रा) व महेश कनासे (30, रा.बाल्या, ता.बडवाह, जि.खरगोन) यांचा धुळे येथे जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.



भरधाव ट्रॉलाच्या धडकेने अपघात
लुमरिया लालसिंग अहिरवाल (भिलाला) हा दोन वर्षांपासून खेडी प्र.ज.जळोद (ता.अमळनेर) येथील डॉ.संजय पवार यांच्याकडे कामास होता व पोळ्यानिमित्त पत्नीला घेऊन गावाकडे परतला. परतीच्या प्रवासात मका कापणीसाठी तिघांना सोबत घेऊन दुचाकीने खेडी प्र.ज.जळोद येथे येत चोपडा-शिरपूर रस्त्यावर चोपड्याकडून टोमॅटो भरून येणार्या ट्रॉलाने धडक दिल्याने चौघांचा मृत्यू ओढवला.
