भुसावळातील भोळे महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त निबंध स्पर्धा
भुसावळ (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात हिंदी दिवसानिमित्त हिंदी विभागाच्या वतीने ‘डिजिटल युग में हिंदी : अवसर और चुनौतियाँ’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन मंगळवार, 15 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी अभिरुची निर्माण करणे, भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच डिजिटल युगातील हिंदीच्या संधी व आव्हानांविषयी विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या स्पर्धेचा उद्देश होता.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हिंदी भाषेचा डिजिटल माध्यमांमधील वाढता वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सोशल मीडिया, ऑनलाईन शिक्षण, भाषांतर तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या विविध विषयांवर आपले विचार निबंधातून मांडले.



हिंदी भाषेचा सन्मान करा :प्राचार्य
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देत हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. हिंदी हमारी पहचान है, हिंदी का गौरव हमारी संस्कृति है, असे सांगत त्यांनी हिंदी भाषेचा सन्मान, संवर्धन आणि प्रसार करण्याचे आवाहन केले. हिंदी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून भारतीय संस्कृती, साहित्य आणि विविधतेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. डिजिटल युगात हिंदी भाषेसमोर नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. भाषेची शुद्धता, योग्य वापर आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची आव्हानेही आहेत, असे त्यांनी नमूद केले. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदी भाषेचा वापर अधिक व्यापक होत आहे. विद्यार्थ्यांनी या बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून हिंदी भाषेच्या विकासात योगदान द्यावे, असेही प्राचार्यांनी सांगितले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
या स्पर्धेचे निरीक्षण प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी केले. सूत्रसंचालन हेमांगी निभारे हिने केले. हिंदी विभागप्रमुख प्रा.जगदीश चव्हाण, प्रा.अनिल सावळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. प्रा.कबीर गवळी यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.
