आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन
मुक्ताईरनगर (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना भुसावळ तालुकाप्रमुख वर्षा तल्लारे यांच्या नेतृत्वाखाली तापी पूर्णा बहुउद्देशीय मागासवर्गीय संस्था (एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात साकरी जिल्हा परिषद मराठी शाळेत वृक्षारोपण तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी तापी पूर्णा बहुउद्देशीय मागासवर्गीय संस्थेच्या संस्थापक लीना तलारे होते. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला ढाके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीतावर नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सविता माळी, उपजिल्हा संघटक मनीषा पाटील, तालुकाप्रमुख रेखा देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या बिना लाल, हमीदा अन्सारी, महेशकुमार महाजन, शिक्षिका ज्योत्स्ना कचरे, सूर्यकांत कडू घुले, एजाज देशमुख तसेच विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.



चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
यानंतर शाळेच्या प्रांगणात उपस्थित सर्व पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आभार लीना तल्लारे यांनी मानले.
