लाखो रुपये किंमतीच्या शेळ्या-बोकडांची चोरी : मध्यप्रदेशातील दोघे कासोदा पोलिसांच्या जाळ्यात


कासोदा (मंगळवार, 15 सप्टेंबर 2026) : कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या 23 शेळ्या-बोकडांचा तपास करताना पोलिसांनी मध्यप्रदेशात धडक कारवाई करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीस गेलेल्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले. आरोपींची टोळीच यामागे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले असून अन्य सदस्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
कासोदा पोलीस ठाण्यात 6 सप्टेंबर 2026 रोजी दाखल फिर्यादीनुसार, 4 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कासोदा शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी 18 लहान-मोठ्या शेळ्या व 5 लहान-मोठे बोकड, अशा एकूण 23 शेळ्या-बोकडांची चोरी करण्यात आली. याप्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कासोदा पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील जिल्हा खरगोन, ता.भगवानपुरा येथे तपास केला. तपासादरम्यान पोलिसांनी अजय राजू चौहाण (साईखेडी, ता.भगवानपुरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) व सोहन विश्राम ब्राह्मणे (बडी, ता.भगवानपुरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यासाठी वापरलेले वाहनही काढून दिले. या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग असून त्यांचादेखील उर्वरीत मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.




यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत पाटील, ग्रेडेड उपनिरीक्षक किशोर पाटील, हवालदार किरण गाडीलोहार, कॉन्स्टेबल योगेश पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !