भुसावळात उपस्टेशन प्रबंधक कार्यालयात सिलिंग कोसळले

प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरील कार्यालयातील घटना ; कर्मचारी थोडक्यात बचावले


भुसावळ (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चार परिसरातील उप स्टेशन प्रबंधक कार्यालय तसेच उद्घोषणा व प्रसारण कार्यालयातील सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. हा प्रकार सोमवार, 14 रोजी सकाळी 11.30 ते 12 वाजेदरम्यान घडली. ही घटना घडली त्यावेळी कार्यालयातील कर्मचारी आपल्या नियमित कामकाजात व्यस्त होते. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही तर या प्रकाराने कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दहा वर्षांपूर्वीच नूतनीकरण
संबंधित कार्यालयाचे सुमारे दहा वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. एव्हढ्या कमी कालावधीत सिलिंगचा भाग कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच देखभाल-दुरुस्तीच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानकावरील अशा महत्त्वाच्या कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेतली जाते का? याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या काळात या कार्यालयात पाणी गळती होत असल्याची माहिती समोर आली आहे. छतामधून सतत गळती होत असल्याने सिलिंग कमकुवत झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, कार्यालय परिसरात मोठ्या घुशींचा वावर असल्याच्या तक्रारीही कर्मचार्‍यांकडून करण्यात आल्या. या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.




ईमारतींचे ऑडीट होण्याची अपेक्षा
या घटनेची गांभीर्याने दखल घेत भुसावळ मंडळातील वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून संपूर्ण इमारतीची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेषतः सिलिंगची मजबुती, पावसाळ्यातील गळती आणि इमारतीच्या एकूण संरचनेचा आढावा घेणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी करून त्यात काही त्रुटी किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे प्रवासी व कर्मचार्‍यांकडून सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी, रेल्वेसारख्या संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होणे चिंताजनक आहे.

तांत्रिक पथकाकडून पाहणी
भुसावळ रेल्वे स्थानकावरील उप स्टेशन प्रबंधक कार्यालयातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना गांभीर्याने घेतली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संबंधित परिसर तत्काळ सुरक्षित करून तांत्रिक पथकाकडून संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पावसाळ्यातील गळतीसह इतर तांत्रिक कारणांचा अभ्यास केला जात आहे. आवश्यक त्या दुरुस्ती तातडीने करण्यात येतील. प्रवासी व कर्मचारी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे जनसंपर्क अधिकारी बी.बी.तपस्वी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !