भुसावळात लिप्टच्या खड्ड्यात पडून सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

सकाळपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पाहताच कुटूंबाचा आक्रोश


भुसावळ (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : शहरातील अमरदीप चौक परिसरातून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह रात्री एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. अदनान सलीम खान (6) असे मृत बालकाचे नाव आहे.

बेपत्ता बालकाचा अखेर मृतदेहच हात
भुसावळातील रहिवासी असलेला अदनान हा बुधवारी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास अमरदीप चौक परिसरातून बेपत्ता झाल्याची नोंद कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात केली. कुटुंबीय व नातेवाईकांकडून त्याचा सर्वत्र शोध सुरू असतानाच बुधवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास सुभाष नेहरू चौकीसमोरील एका नव्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या खड्ड्यात मुलाच्या चपला तरंगत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता खड्ड्यात साचलेल्या पाण्यात अदनानचा मृतदेह तरंगताना दिसताच कुटूंबाने मन हेलावणारा आक्रोश केला.




बाजारपेठ पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली. पोलिसांनी जमाव पांगवून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवला. बालक खेळत असताना बांधकामस्थळी असलेल्या लिफ्टच्या खड्ड्यात पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित खड्ड्यात सुमारे आठ फूट पाणी साचलेले असल्याचे सांगण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजनुसार अदनान दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास त्या बांधकाम परिसरात जाताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !