हरवलेले मोबाईल हातात पडताच तक्रारदारांचे उजळले चेहरे : नंदुरबार शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

नऊ लाखांचे हरवलेले 52 मोबाईल तक्रारदारांना परत : तांत्रिक विश्लेषणानंतर कारवाई


नंदुरबार (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : कधी प्रवासात तर कधी सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल चोरी होतात. महागड्या मोबाईलच्या चोरीमुळे आर्थिक नुकसानीसोबत मोबाईलमधील महत्वाचा डाटाही जात असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढते मात्र नंदुरबार शहर पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्यात तपास करून तब्बल 52 मोबाईल फोन हस्तगत केले. या मोबाईलची एकूण किंमत आठ लाख 96 हजार 950 रुपये इतकी आहे. तक्रारदारांच्या हातात पुन्हा मोबाईल येताच आनंदाने त्यांचे चेहरे उजळल्याचे दिसून आले व त्यांनी पोलिसांच्या या कृतीचे आभार मानले.

तक्रारीच्या आधारे कारवाई
नागरिकांनी मोबाईल हरविल्याबाबत केलेल्या तक्रारींची दखल घेत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून हरविलेल्या मोबाईलचा शोध घेतला. पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलपैकी काही मोबाईल फोन बुधवार, 16 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्याहस्ते संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. या कारवाईत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज महाले आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र भील यांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली.




सात नागरिकांना मोबाईल सुपूर्द
मोबाईल फोन प्राप्त झालेल्या नागरिकांमध्ये ठगूबाई रुपल्या कुवर, विनोद धर्मा तायडे, प्रकाश विठ्ठल माळी, शैलेश पोपट चौधरी, गोरख एकनाथ जाधव, राकेश पाटील आणि निलेश मराठे यांचा समावेश आहे. हे सर्व नागरिक नंदुरबार येथील रहिवासी आहेत. मोबाईल परत मिळाल्यानंतर निलेश मराठे आणि ठगूबाई कुवर यांनी पोलिसांचे आभार मानत तांत्रिक तपासाबद्दल समाधान व्यक्त केले.

मोबाईल हरवल्यास तत्काळ तक्रार करा
नागरिकांचा मोबाईल फोन हरवल्यास त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. मोबाईलचा आयएमईआय क्रमांक आणि आवश्यक माहिती पोलिसांना दिल्यास हरविलेला मोबाईल शोधण्यास मदत होते. यापूर्वी मोबाईल हरवल्याबाबत तक्रार नोंदविलेल्या नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांचा मोबाईल पोलिसांकडून हस्तगत झाला आहे का, याची माहिती घ्यावी, असे आवाहन शहर निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पंकज महाले व कॉन्स्टेबल रवींद्र भील आदींनी केली.

पोलीस सेवेसाठी तत्पर
नागरिकांच्या सेवेसाठी नंदुरबार पोलीस सदैव तत्पर असून नागरिकांनी पोलिसांशी सहकार्य करावे व मोबाईल फोन हरविल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !