धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : दहशतीसाठी दहा तलवारी बाळगणार्या दोंडाईतील तरुणांना बेड्या
एका संशयीताची गुन्हेगारी पार्श्वभूमी : खुनासह चार गंभीर गुन्ह्यांची नोंद
धुळे (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : दहशत माजविण्याच्या उद्देशाने तलवारी बाळगून त्या विक्रीसाठी आणल्याच्या संशयावरून धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दोंडाईचा शहरातील दोघांना अटक केली आहे. संशयीताच्या ताब्यातून 10 तलवारी आणि एक वाहन असा एकूण पाच लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील एका संशयीताविरोधात खुनासह गंभीर प्रकारच्या चार गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना काही संशयीत वाहनातून तलवारी दहशतीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर भूषण माधवराव गवळे (31, रा.गोपालपुरा, कृष्ण मंदिराजवळ, दोंडाईचा) व आकाश प्रकाश ईशी (36, रा.गुरव स्टॉप, दोंडाईचा) हे वाहन (क्रमांक (जी.जे.06 जे.01-1206) वाहनातून येताच त्यांना दोंडाईचा-शहादा रस्त्यावरील पीरबल्ली जवळून ताब्यात घेण्यात आले. वाहनाच्या झडतीत त्यात 30 हजार रुपये किंमतीच्या दहा तलवारी आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या तसेच पाच लाखांचे वाहनही जप्त करण्यात आले.



एका संशयीताविरोधात चार गुन्हे
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयितांकडून तलवारी कुठून आणल्या, त्या कोणाला विक्री करणार होते तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास केला जात आहे. शिवाय संशयीत भूषण गवळे याच्याविरुद्ध नरडाणा, सारंगखेडा, अहमदाबाद (गुजरात) व दिंडोली (गुजरात) येथे खुनासह आर्म अॅक्ट व एनडीपीएस अन्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा.निरीक्षक दीपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार, हर्षल चौधरी, राहुल गिरी, जगदीश सूर्यवंशी, अमोल पाटील, सिद्धार्थ निकम आदींच्या पथकाने केली.
