आजची मुलगी मानसिक, शारीरिक व भावनिकदृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज : भुसावळात आदित्य कुकरेजा
भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे
भुसावळ (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : आजच्या बदलत्या काळात मुलींनी मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत जे.के.ए.इंडिया जळगाव जिल्हा शाखेचे मुख्य प्रशिक्षक आदित्य कुकरेजा यांनी येथे व्यक्त करीत मुलींना सक्षम करण्यासाठी कुटुंब, शाळा आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत स्वसंरक्षण, जागरूकता आत्मविश्वास आणि सुरक्षा या विषयास अनुसरून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण व्हावे
आदित्य कुकरेजा यांनी मुलींमध्ये आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची जाणीव आणि निर्णयक्षमता विकसीत करण्यावर त्यांनी भर दिला. समाजाने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सुरक्षित व प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे अतिथी होते. अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वाय.एम.पाटील होते. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका व महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्षा स्वाती पाटील, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य नीना कटलर होत्या. प्रसंगी आदित्य कुकरेजा यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देत संकटसमयी स्वतःचा बचाव कशा पद्धतीने करावा यासाठी मार्गदर्शन केले.



यांनी घेतले परिश्रम
प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख माधुरी चौधरी यांनी तर सूत्रसंचालन सुरेखा भोळे यांनी व आभार जयश्री येवले यांनी मानले. यशस्वीतेसाठी समिती सदस्य कांचन राणे, जयश्री येवले, सर्व शिक्षिका वृंद व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
