पेन्शन बिल मंजुरीसाठी चार हजारांची लाच घेताना पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक जाळ्यात


गोंदिया (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या सुधारित पेन्शन बिलाचे काम करून धनादेश देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती गोंदिया येथील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी, 17 सप्टेंबर आस्थापना विभाग, पंचायत समिती गोंदिया येथे करण्यात आली. संदीप शाहूराव सानप (31, वडझरी, ता.पाटोदा, जि.बीड, ह.मु.हनुमान कॉलनी, कुडवा परिसर, गोंदिया) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयीत हा गोंदिया पंचायत समितीतील आस्थापना विभागात कनिष्ठ सहाय्यक आहे.

पेन्शनची रक्कम कमी मिळत असल्याने केली होती तक्रार
तक्रारदार महिला या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, दवणेवाडा, ता. जि. गोंदिया येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्या डिसेंबर 2020 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर त्यांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत पेन्शन मिळत होती मात्र पेन्शनची रक्कम तपासल्यानंतर ती अपेक्षेपेक्षा कमी मिळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे कपात झालेली रक्कम मिळावी आणि पेन्शनमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी त्यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता.




या कामाबाबत चौकशी करण्यासाठी त्या पंचायत समिती शिक्षण विभागात गेल्या असता, संबंधित लिपिक संदीप सानप याने त्यांचे बिल पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगून ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागत सुरूवातीला एक हजार रुपये स्वीकारून उर्वरित चार हजार रुपये चेक तयार झाल्यानंतर देण्यास सांगितले.

पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने 17 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पंच आणि व्हॉइस रेकॉर्डरसह तक्रारदारांना संबंधित कार्यालयात पाठवून लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी सानप याने तक्रारदारांच्या सुधारित पेन्शन बिलाचे काम करून चेक देण्यासाठी चार हजार रुपये मागितल्याचे आणि ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे कारवाई अहवालात नमूद आहे.

चार हजारांची लाच स्वीकारतना रंगेहात पकडले
यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदारांना पंच आणि व्हॉइस रेकॉर्डसह लाचेची रक्कम देऊन पंचायत समिती गोंदिया येथील आस्थापना विभागात पाठविण्यात आले. यावेळी आरोपी संदीप सानप याने चार हजारांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी लोकसेवकाविरुद्ध पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा गोंदिया एसीबीचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अरविंद राऊत व सहकार्‍यांनी यशस्वी केला.

नागरिकांना एसीबीचे आवाहन
भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी : 07182-251203 / 9209041064 वा 1064 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !