अमळनेरात बोरी काठावर बसलेल्या तरुणावर बिबट्याचा अचानक हल्ला

बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये दहशत : वनविभागाने लावला पिंजरा


अमळनेर (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : गुरे चारणार्‍या मित्रांना भेटण्यासाठी गेलेल्या शहरातील 23 वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केला मात्र तरुणाने धाडस दाखवत जोर-जोरात आरडा-ओरड केल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. ही धक्कादायक घटना गुरुवार, 17 रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास सानेनगर भागाजवळील बोरी नदी काठाजवळ घडली. या घटनेने अमळनेर भीतीच्या सावटाखाली असून वनविभागाने सतर्कता म्हणून तातडीने या परिसरात पिंजरा लावला आहे.

काय घडले तरुणासोबत ?
योगेश मनोज पाटील (24, साने नगर, अमळनेर) हा तरुण त्याच्या गुरे चारणार्‍या मित्रांना भेटण्यासाठी गुरुवारी दुपारी बोरी नदीकाठाजवळ आला असता तो झुडुपांजवळ बसलेला असताना अचानक पाठीमागून बिबट्या आला व त्याने तरुणावर झडप घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. बिबट्याने मारलेल्या पंजात योगेशचा शर्ट अडकल्याने त्याने तरुणाला झुडूपांमध्ये नेण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक झालेल्या हल्ल्यानंतर घाबरलेल्या तरुणाने अशा कठीण प्रसंगात धाडस दाखवले व बिबट्याला ठोसा मारून सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या सोडत नसल्याचे पाहून तरुणाने जोर-जोरात वाचवा-वाचवा म्हणून आरोळ्या मारायला सुरुवात केली. याचवेळी त्या भागातून जाणार्‍या बैलगाडी चालकाने धाव घेतल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली.




तरुणावर ग्रामीण रुग्णालयात उपचार
ही घटना वनपाल गुलाब पिंजारी यांना कळवण्यात आल्यावर त्यांनी वनरक्षक योगेश पाटील, मनीषा मोरे यांच्यासह पथकाला घटनास्थळी पाठवले. योगेश या तरुणाला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी नगरसेवक मुख्तार खाटीक व इतर नागरिकांनी हातात काठ्या घेऊन बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

वनविभागाने लावला पिंजरा
वनाधिकारी छत्रपती चव्हाण यांच्या परवानगीने ट्रॅप कॅमेरे आणि दोन पिंजरे लावण्यात येत असून एका पिंजर्‍यात बिबट्यासाठी लहान प्राणी शिकार म्हणून ठेवण्यात येईल. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर त्याला पकडून वरिष्ठांच्या आदेशाने जंगलात सोडण्यात येईल, असे वनपाल गुलाब पिंजारी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !