पूजेसोबत प्रबोधनाचा जागर : भुसावळच्या सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशनचा गणेशोत्सव ठरतोय खास
भुसावळ (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सवाला भक्तीची जोड असतेच मात्र त्यासोबत कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक जाणीव यांचा संगम साधत उत्सव अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाच्या गणपती उत्सवातून यंदा करण्यात आला आहे. धार्मिक विधींसोबत विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी, प्रबोधनपर चर्चासत्रे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी भाविक व नागरिक अनुभवत आहेत.
विविध स्पर्धांचे आयोजन
सोमवारी सायंकाळी मंगल वाद्यांच्या गजरात नवसाचा गणपती मंदिरापासून मिरवणूक काढून मुख्य मंडपात श्रींची स्थापना करण्यात आली. त्रिपदी पठण, विष्णुसहस्रनाम जप, अथर्वशीर्ष पठण आणि सामूहिक शंखनादाने उत्सवाची भक्तिमय सुरुवात झाली. उत्सवाच्या निमित्ताने विविध वयोगटांसाठी स्लो सायकलिंग, सुदृढ बालक, रांगोळी, स्मरणशक्ती, रंगभरण, निबंध, सोलो डान्स, ग्रुप डान्स तसेच महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप’ या विषयावर निबंध स्पर्धाही घेण्यात येणार आहे.



‘जेन झी टू जेन अल्फा विथ गणपती बाप्पा’ या चर्चासत्रातून नव्या पिढीशी संवाद साधण्याचा उपक्रमही उत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे. दरम्यान, सुरभी नगरातील जय गणेश फाउंडेशन मंडळाने उभारलेले भव्य प्रवेशद्वार नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता बाप्पांची पालखीतून विसर्जन मिरवणूक निघणार असून पारंपरिक वाद्यांसह वारकरी दिंडीच्या गजरात गणेशभक्तांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडणार आहे.
